सात्रळ परिसरात दुधाचा टँकर पळविण्याचा प्रयत्न फसला

व्यावसायिक स्पर्धेतून सुपारी दिल्याची चर्चा
सात्रळ परिसरात दुधाचा टँकर पळविण्याचा प्रयत्न फसला

राहुरी|प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील सात्रळ डेअरीचा दुधाने भरलेला टँकर लुटण्याचा प्रयत्न चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अयशस्वी ठरला. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून टँकर अडविणार्‍या चोरट्यांना हूल देऊन ही खबर तातडीने लोणी पोलीस ठाण्यात दिल्याने टँकरचा पाठलाग करणारे चोरटे तेथून पसार झाले.

याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकरच्या पाळतीवर असलेले हे चोरटे स्थानिक असल्याची चर्चा असून ही फसलेली रस्तालूट व्यावसायिक स्पर्धेतून सुपारी देऊन होत असल्याची चर्चा परिसरात चालू आहे.

दि. 15 रोजी रात्रीच्या सुमारास तब्बल 20 हजार लिटर दूध सात्रळहून नवापूरला घेऊन निघालेला एमएच 17एजी 9985 हा टँकर पाळत ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्यांनी डेअरीपासून 700 मिटर अंतरावर अडविला. पाठीमागून पांढर्‍या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनात आलेल्या अज्ञात चोरट्यांनी टँकरचालक युसूफ मन्सूर बेग यास शिवीगाळ करून टँकर पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, चालक बेग याने मोठ्या शिताफीने तो टँकर तेथून पुढे काढण्यात यश मिळविले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी पुन्हा टँकरचा पाठलाग करून टँकरला कोल्हारनजिक गाठले. तोपर्यंत बेग याने पोलिसांना दूरध्वनीवरून ही माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोकॉ. आव्हाड, पोकॉ. सांगळे हे कोल्हार रस्त्यावरील वजनकाट्यानजिक हजर झाले. तोपर्यंत ते अज्ञात चोरटेही टँकरजवळ येऊन पोहोचले. त्यातून चारजण टँकरच्या दिशेने येत असताना त्यांना पोलिसांची चाहूल लागताच ते तेथून पसार झाले.

दरम्यान, पोलिसांनी तेथे आढळून आलेल्या स्कॉर्पिओ वाहनाची झडती घेतली असता त्यात लाकडी दांडके, दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी हा मुद्देमाल वाहनासह ताब्यात घेतला. त्यावरून एका संशयिताला पकडून त्याची चौकशी केली असता त्याने आपले टोपणनाव ‘चेअरमन’ असल्याची कबुली दिली. या घटनेमुळे सात्रळ परिसरात दहशत पसरली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून ही घटना सुपारी देऊन करण्यात आली असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com