सात्रळला विद्युत मोटार व केबल चोरट्यांचा धुमाकूळ

सात्रळला विद्युत मोटार व केबल चोरट्यांचा धुमाकूळ

सात्रळ |वार्ताहर| Satral

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) सात्रळ (Satral) परिसरात शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी (Electric motor) व केबल चोरट्यांचा (Cable thieves) धुमाकूळ सुरू झाला आहे. येथील शेतकरी सुभाष कारभारी कडू यांच्या शेतातून केबल चोरी (Cable thieves) करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. तर काही शेतकर्‍यांच्या शेतात असणार्‍या इलेक्ट्रिक मोटारीच्या केबल (Electric motor Cable) चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहेत.

कडू यांची शेतजमीन सात्रळ गावातील नदीच्या कडेला गट नंबर 16 मध्ये असून शनिवारी रात्री 500 ते 600 फूट इलेक्ट्रिक मोटारीची केबल अंदाजे किंमत 5 ते 6 हजार रुपये असलेली केबल चोरीला गेली. रविवारी सकाळी त्यांची पत्नी मोटर चालू करायला गेल्यानंतर इलेक्ट्रिक मोटर चालू का होत नाही? म्हणून त्यांचे पती सुभाष कडू यांनी शेतात पाहणी केली असता इलेक्ट्रिक मोटरची केबलच चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अगोदरही या परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्या मोटारीच्या इलेक्ट्रिक केबल चोरीला गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत मात्र, शेतकरी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता किंवा या होणार्‍या चोरीबद्दल पोलीस स्टेशनला तक्रारी करण्यास तयार नाही. कारण तक्रार करूनही चोरीचा तपास लागत नसल्यामुळे कोणीही तक्रार देण्यास तयार नाही, असे या भागातील शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

त्यातच सात्रळमधील डी पी जळाली असल्यामुळे तीही आता शेतकर्‍यांनी वीजबिल भरल्यानंतर दोन दिवसापूर्वी चालू केलेली आहे. एकूणच सध्या प्रवरा परिसरासह राहुरी तालुक्यातील काही गावांमध्ये महावितरणकडून भारनियमनाचे चटके सध्या सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, घरगुती ग्राहकांना बसत आहेत. या भागामध्ये रात्रीचे भारनियमन असल्यामुळे तसेच बिबट्याचा मोठ्या प्रमाणात संचार वाढल्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात किंवा घराबाहेर कोणीही निघण्यास तयार नसून अशा होणार्‍या या चोर्‍यांमुळे सध्या तरी शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. अशा होणार्‍या या भुरट्या चोरांचा तपास पोलिसांनी लावावा, अशी मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com