सातबार्‍यावरून जातीचा उल्लेख हद्दपार

सातबार्‍यावरून जातीचा उल्लेख हद्दपार

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

महसूल विभागाने सातबारा उतार्‍यावरील शेतीचे स्थानिक नाव या रकान्यात जातीवाचक नावाचा उल्लेख न करण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला होता. या निर्णयाची जिल्ह्यातील प्रथम अंमलबजावणी राहाता व नेवासा तालुक्यात करण्यात आली आहे.

राहात्यामधील बाभळेश्वर व नेवासामधील रामडोह, गोपाळपूर, वरखेड, माळेवाडी दुमला, सुरेगाव दहिगाव, गळनिंब व खामगाव या गावातील ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे या गावातील 7/12 उतार्‍यावरील जातीची नावे आता हद्दपार होणार आहेत. या निर्णयाचे गावकर्‍यांनी स्वागत केले आहे.

समाजातील जाती-पातीच्या भिंती गळून सामाजिक सलोखा व सौहार्दपूर्ण वातावरण टिकून राहावे. यासाठी शासनाच्या महसूल विभागाने 25 ऑगस्ट 2021 रोजी 7/12 उतार्‍यातील शेतीचे स्थानिक नाव या रकान्यात नोंदवण्यात आलेल्या जातीवाचक नावाची नोंद कमी करून सुधारित नोंद घेण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला होता. यात जातीच्या नावाऐवजी आवश्यक असल्यास गावातील स्थानिक-भौगोलिक स्थितीशी निगडित, नदी नाल्याची निगडित नावे देण्यात यावी. अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

बाभळेश्वर ग्रामपंचायतीने 7/12 उतार्‍यावर जातीच्या नावाचा उल्लेख न करण्याचा ठराव केला आहे. या ठरावानुसार बाभळेश्वर गावातील एका शेतकर्‍याच्या सातबारा उतार्‍यावरील शेतीचे स्थानिक नावामधील...(जातीचा उल्लेख) गट नंबर हा उल्लेख हद्दपार करत बनसोडे यांचा गट नंबर असा जातीविरहित नावाचा उल्लेख असलेला 7/12 उतारा देण्यात आला आहे.

महसूल विभागाच्या या मोहिमेविषयी राहाता तहसीलदार कुंदन हिरे म्हणाले, यापूर्वी शासनाने जातीवाचक वस्त्यांचे नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. आता 7/12 उतार्‍यावरील जातीचे नाव हद्दपार करण्याच्या निर्णयाने गावागावात सामाजिक वातावरण निकोप होण्यास मदत होणार आहे. यातून अ‍ॅट्रासिटी गुन्ह्यांच्या प्रमाणातही घट होण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com