सार्वमत इफेक्ट : अण्णासाहेब शिंदे सभागृहाची घुले, गडाख यांच्याकडून पाहणी

स्वच्छतेसोबत नुतनीकरणाच्यादृष्टीने केल्या सूचना
सार्वमत इफेक्ट : अण्णासाहेब शिंदे सभागृहाची घुले, गडाख यांच्याकडून पाहणी

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेच्या वैभवशाली परंपरचे प्रतिक असणाऱ्या अण्णासाहेब शिंदे सभागृहाच्या दुरवस्थेची पाहणी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले आणि अर्थ आणि कृषी समितीचे सभापती सुनील गडाख यांनी केली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षा घुले आणि सभापती गडाख यांनी सभागृहाच्या स्वच्छतेसोबत नुतनीकरणासाठी आराखडा आणि निधी उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या.

मागील आवठड्यात जिल्हा परिषदेच्या जुन्या आणि सुमारे २५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे सभा झालेल्या शिंदे सभागृहाच्या दुरवस्थेचे वृत्त 'सार्वमत'ने प्रसिध्द केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू पाटील, बाबासाहेब भोस, बाबासाहेब भिटे आणि विद्यमान ज्येष्ठ सदस्य राजेश परजणे यांनी सभागृहाच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच किमान जुन्या सभागृहाची स्वच्छता राखावी. नवीन इमारती झाल्यावर जुन्या इमारती आणि तिच्या इतिहासाचे जतन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

त्यानंतर शुक्रवारी दुपारी अध्यक्ष घुले आणि सभापती गडाख यांनी नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी झेडपी अधिकाऱ्यांची आढावा बैठक आटोपल्यानंतर आवर्जून जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारती शेजारी असणाऱ्या सभागृहाकडे जाऊन पाहणी केली.

तसेच जुन्या प्रशासकीय इमारतीसह सभागृहाची ऐतिहासीक वास्तू म्हणून जतन करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने हालचाली कराव्यात. जुन्या इमारतीच्या नुतनीकरणासाठी सुमारे ४० लाखांचा निधी उपलब्ध असून आणखी निधीची जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पनात तरतूद करण्यात येणार असल्याचे अर्थ समितीचे सभापती गडाख यांनी सांगितले.

यावेळी या जुन्या सभागृहातील आठवणींना सभापती गडाख यांनी उजाळा दिला. तसेच या सभागृहात आपण चार सभांना हजर असल्याचे सार्वमतशी बोलताना सांगितले. नगर जिल्हा परिषदेला वैभवशाली परंपरा असून अण्णासाहेब शिंदे सभागृहात कामकाज केलेले सदस्यांनी पुढे राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवलेला आहे. अशा या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या जुन्या इमारतीसह शिंदे सभागृहाकडे तातडीने लक्ष देण्याच्या सूचना अध्यक्षा घुले यांनी दिल्या.

सोमवारी होणार पाहणी

पुण्यातील पुरातत्व विभाग आणि ऐतिहासिक वास्तूचे नुतनीकरण करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी नगरला येऊन झेडपीच्या जुन्या इमारतीची पाहणी करणार आहेत. या इमारतीची सद्य स्थिती आणि भक्कमपणा तपासून पुढील निर्णय घेणार आहे. जुन्या इमारतीचा नुतनीकरणाचा आराखडा करण्यासाठी साधारणपणे पाच लाखांहून अधिकचा खर्च येणार आहे.

Related Stories

No stories found.