
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वत्र पाण्याची कमतरता भासू लागते. त्यात पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्यातील जंगलामधील प्राण्यांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. त्यांच्यावर भूतदया दाखवत सुपा गावचे सरपंच योगेश रोकडे गेल्या चार वर्षांपासून स्वखर्चाने टँकरद्वारे पाणवठ्यांमध्ये पाणी सोडून वन्य जीवाची तहान भागवत आहेत.
पारनेर तालुक्यातील शहाजापूर, सुपा, हंगा या गावाच्या सिमावर्ती भागात वन विभागाचे शेकडो एकर क्षेत्र आहे. यात मोठ्या प्रमाणात डोंगरी भाग, वृक्षवल्ली आसल्याने येथे मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी आहेत . यात प्रामुख्याने हरीण, ससे, कोल्हे, खोकड, लांडगे, रानडुकरे तर अनेकदा बिबट्यांचेही दर्शन या भागात होते. या वन्यप्राण्यांसह मोर, घार, बगळे, यासह इतर अनेक लहान मोठे पक्षीही मोठ्या प्रमाणात आढळतात. जंगली भाग तसेच या भागाला खेटून शेती असल्याने वण्य प्राण्यांना चारा तसेच भक्ष मिळते. परंतु उन्हाळा सुरू होताच मुळात डोंगरी भाग असल्याने येथील पाणवठे सुकून जातात. यामुळे उन्हाळ्यातील चार महिन्यांत या वन्य जीवाची पाण्यासाठी मोठी वणवण होते. अनेकदा हे वन्य जीव पाण्याच्या शोधार्थ मानवी वसत्यांकडे येतात. अशावेळी त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला होतो. अनेक प्राणी कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी पडतात किंवा पळायच्या नादात विहिरीत, शेततळ्यात पडून मृत्यू पावतात.
वन्यजीवांना जंगलातच पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वन विभागाच्या वतीने पाणवठे तयार केले आहेत. मात्र यामध्ये पाणी सोडण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नाही. यामुळे या जीवांना दिलासा देण्याच्या उद्देशाने गेल्या चार वर्षांपासून सुपा गावचे सरपंच योगेश रोकडे मनाचा मोठेपणा दाखवत या वन्यजीवांना स्वखर्चाने पाणी पाजतात. मंगळवारी (दि.5) सरपंच रोकडे यांनी मजूर लावून जंगलातील पाणवठा स्वच्छ केला. त्याची थोडीफार दुरुस्ती करून त्यात टँकरद्वारे दहा हजार लिटर पाणी सोडले. हे पाणी वन्यप्राणी, पक्षांनी पिऊन, गळती, बाष्पीभवन यासह आठ दिवस पुरते. त्यानंतर ठराविक कालावधीत नंतर पुन्हा टँकरद्वारे पाणी सोडले जाते. यावेळी उपसरपंच दत्तात्रय पवार, माजी उपसरपंच सागर मैड, ग्रांमपंचायत सदस्य प्रताप शिंदे, विजय पवार, सुरेश नेटके, राहुल पवार, संभाजी झरेकर, संचित मगर, दादा टोणगे, शुभम गायकवाड सुरेंद्र शिंदे उपस्थित होते.
निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे .निसर्गातील प्रत्येक घटक हे आपलेच कुणीतरी आहेत .जंगलातील वन्यजीवही आपल्या भूमातेचे घटक आहेत .त्यामुळे संकटाच्या काळात या मुक्या जीवांना दिलासा देणे हे आपले कर्तव्य आहे . सुपा पारिसरातील दानशुरांनी पुढे येऊन उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या प्रियजनांच्या आठवणी म्हणून या मुक्या जीवाना पाणी पाजावे.
- योगेश रोकडे, सरपंच सुपा