ग्रामसभेत प्रश्न विचारणार्‍यास सरपंचाकडून शिवीगाळ, सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

ग्रामसभेत प्रश्न विचारणार्‍यास सरपंचाकडून शिवीगाळ, सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

निधी बाबत प्रश्न विचारणार्‍या ग्रामस्थाला सरपंचाने भर ग्रामसभेत अर्वाच भाषेत शिवीगाळ करून दमदाटी केल्याची घटना तालुक्यातील खराडी येथे बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी सरपंच शिवाजी चत्तर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील खराडी येथे बुधवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. या सभेमध्ये विविध विषयावर चर्चा सुरू होती. विलास रघुनाथ मोरे या ग्रामस्थाने गावच्या निधीबाबत ग्रामसेवकाकडे प्रश्न उपस्थित केला. यामुळे सरपंंच संतप्त झाले. त्यांना राग अनावर झाल्यानेेे त्यांनी या ग्रामस्थास अर्वाच भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

आपण निधीबाबत ग्रामसेवकाला प्रश्न विचारला असल्याचे मोरे यांनी सरपंचांना सांगितले. तू नियमाने बोल, आरोप करताना विचार कर, ग्रामसेवकावर आरोप करणे म्हणजे माझ्यावर आरोप केल्यासारखे आहे, असे यावेळी सरपंच सांगत होते. सरपंच ग्रामसभा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. निधी कसा आला, मागासवर्गीय निधी कसा खर्च केला? हे विचारायचेे नाही का? असा सवाल या ग्रामस्थांनी केला. मी जे सांगतो तेच होतं मी शिव्या देईल नाहीतर काही पण करेल, असे सांगून सरपंचांनी यावेळी संबंधित ग्रामस्थास जोरदार शिवीगाळ केली.

ग्रामसभेत झालेली शिवीगाळ सहन न झाल्याने संतप्त झालेल्या विलास मोरे यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात सरपंचाविरुद्ध तक्रार केली. मोरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सरपंचांच्या विरोधात अदखलपात्र गुुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान सरपंच शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चत्तर हे लोकनियुक्त सरपंच आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com