‘सरपंच-उपसरपंच’ नावे खाद्यपदार्थ, दुकानांना देण्यास बंदी घालण्याची मागणी

‘सरपंच-उपसरपंच’ नावे खाद्यपदार्थ, दुकानांना देण्यास बंदी घालण्याची मागणी

सात्रळ |वार्ताहर| Satral

‘सरपंच-उपसरपंच’ नावाने असणार्‍या खाद्यपदार्थ, पेये, दुकानांना नावे देण्यास बंदी घालण्याची मागणी राहुरी तालुक्यातील सोनगावचे उपसरपंच किरण अंत्रे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नगर दक्षिण भाजपा ओबीसी युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण अंत्रे यांनी निवेदनात म्हटले, सरपंच या पदाला कायद्याने अनन्यसाधारण महत्व दिलेले असून आपण सरपंच हे गावाचे प्रथम नागरिक म्हणून समजतो. मुंबई ग्रा.पं.अधिनियम 1958/59 च्या कलम 30 नुसार संविधानिक असणार्‍या सरपंच-उपसरपंचपदाची नावे अनेक व्यावसायिक आजकाल जाहिरात म्हणून कापड दुकान, बार, रेस्टॉरंट, चहाची हॉटेल तसेच अन्य आस्थापनांना सर्रासपणे देत आहेत.

या अत्यंत महत्वाच्या पदाची नावे दिली असताना या व्यावसायिकांनी फूड लायसन्स, शॉप अ‍ॅक्ट लायसन्स, परमिट रूम आदी परवानगी घेतलेली असेलच. परवाने देताना संबंधित विभागानेही किंवा अधिकार्‍यांनी अशा नावांच्या दुकानांना परवानगी दिलीच कशी? जर अशाप्रकारे परवानगी दिली असेल तर त्या नेमक्या कोणी दिलेल्या आहेत? याबाबत चौकशी करावी. रस्त्याने चालताना अशाप्रकारचे नावे हॉटेल, ढाबा व अन्य ठिकाणी वाचून अक्षरशः चीड निर्माण होते.

या संविधानिक पदाच्या नावांचा अशाप्रकारे दुरुपयोग अपमान होत असून याबाबत गांभिर्याने दखल घेतली गेली नाही तर भविष्यात अनेक आस्थापना, बार, अथवा हॉटेलांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार अशाप्रकारच्या महत्वाच्या पदांची नावे पहायला मिळू शकतात. या बाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन अशा आस्थापनांची नावे बदलण्यासाठी अथवा काढण्यासाठी आदेश अथवा सूचना करून आदेशाचे वा सूचनांचे पालन न करणार्‍यांवर कार्यवाही करावी.या प्रकारामुळे या महत्वाच्या पदाबरोबरच आपला महाराष्ट्र अपमानित होऊ नये, एवढीच माफक अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com