
घारगाव |वार्ताहर| Ghargav
जवळेबाळेश्वर गावातील व्हाट्सअप गृपवर बातम्या पाठविल्याच्या कारणावरून जवळेबाळेश्वर गावाच्या सरपंचाने गावातील एका आदिवासी प्राथमिक शिक्षकास कुबडीने मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर गावचे शिवारात शुक्रवारी (13 जानेवारी) सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी शिक्षक संजय धोंडीबा कौटे (वय-46, रा. जवळे बाळेश्वर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरपंच रामकृष्ण नाथा पांडे (रा.जवळेबाळेश्वर) यांच्या विरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय कौटे हे कोठे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. ते जवळेबाळेश्वर येथे राहतात. शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास गावातील एका पंचर दुकानाजवळ आले असता येथील सरपंच रामकृष्ण पांडे तेथे आले. ‘तू गावचे ग्रुपवर बातम्या का पाठवतो’ असे म्हणत कौटे यांना जातीवाचक शिविगाळ केली.
डोक्यात व डाव्या डोळ्याजवळ कुबडी मारत ढकलून दिले. ‘पुन्हा नादाला लागला तर जिवंत ठेवणार नाही’ अशी धमकी दिली. असे शिक्षक कौटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.आर.ए.गांधले हे करीत आहेत.