
उंबरे |वार्ताहर| Umbare
डॉ.तनपुरे कारखान्याची सुमारे 21 वर्षापूर्वीच्या थकीत अॅडव्हान्सपोटी राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील सरपंच अमृत अण्णासाहेब धुमाळ यांची मुसळवाडी येथील गटनंबर 229 मधील शेती राहुरी न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर कारखान्याचा अॅडव्हान्स उचलून तो भरण्यास टाळाटाळ करणार्या थकबाकीदारांना डॉ.तनपुरे कारखाना प्रशासनाने चांगलीच चपराक दिल्याने अन्य थकबाकीदारांची धाबे दणाणले आहेत.
तत्कालीन राहुरी कारखाना प्रशासनाकडून मुसळवाडी येथील अमृत अण्णासाहेब धुमाळ यांनी दि. 31 मार्च 2001 रोजी दोन लाख बेचाळीस हजार सातशे सदतीस रुपये अॅडव्हान्स घेतला होता. याबाबत अॅडव्हान्स वसुलीसाठी तत्कालीन कारखाना प्रशासनाने धुमाळ यांना वेळोवेळी नोटिसा पाठवून थकबाकी भरण्याचे सूचित केले होते. मात्र, त्याकडे धुमाळ यांनी दुर्लक्ष केले.
दरम्यान, कारखाना प्रशासनाने अॅडव्हान्स उचल व त्यावरील 25 टक्के व्याजदराने वसुलीसाठी श्रीरामपूर येथील सहकार न्यायालयात कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक मार्कंडे यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. त्यानुसार सहकार न्यायालयाने राहुरी कारखान्याच्या बाजूने निकाल देऊन वरील थकीत रकमेवर 14 टक्के व्याजाने रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर राहुरी कारखान्याने 3 लाख 42 हजार 904 एवढी व्याजासह रक्कम वसूल होण्यासाठी दि. 5 जानेवारी 2009 रोजी दरखास्त दाखल केली होती.
यावर धुमाळ यांनी ही रक्कम जमा केली नाही. त्यामुळे राहुरी दिवाणी न्यायालयाने दि. 5 फेब्रुवारी 2022 रोजी मौजे मुसळवाडी येथील गटनंबर 229 मधील एक एकर क्षेत्र जप्त करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार विद्यमान डॉ.तनपुरे कारखाना प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार दि. 19 एप्रिल रोजी ही मालमत्ता जप्त केली आहे. राहुरी दिवाणी न्यायालयाने ही मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावली आहे. कारखान्याच्या वतीने अॅड. डी.आर. गोपाळे यांनी काम पाहिले.