
शनीशिंगणापूर |वार्ताहर| Shanishinganapur
छत्रपती शाहू महाराजांपासून आम्ही मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असून यापुढेही या प्रश्नासाठी कायम राजकीय विरहित अग्रेसर राहू ,अशी ग्वाही माजी खासदार संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगिताराजे भोसले यांनी दिली.
युवराज्ञी संयोगिताराजे भोसले यांनी शनीशिंगणापूर येथे शनीचौथर्यावर जाऊन 11 लिटर तेल शनिमूर्तीला वाहून दर्शन घेतले. यावेळी देवस्थानचे सरचिटणीस आप्पासाहेब शेटे व पोलीस पाटील अॅड. सयाराम बानकर यांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.
यावेळी त्या म्हणाल्या, दर्शन झाल्याने मन प्रसन्न व समाधान वाटते. छत्रपती शाहू महाराजापासून आम्ही मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असून यापुढेही कायम राजकीय विरहित अग्रेसर राहू अशी ग्वाही दिली. सुमारे 5 वर्षांपूर्वी महिलांचा चौथर्यावर प्रवेशाचा प्रश्न चुकीच्या मार्गाने सोडवला गेला असून यामुळे परिसरातील जुन्या-जाणत्या ग्रामस्थांना आजही वाईट वाटते.
संत-महंत यांना विश्वासात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांच्या सन्मानाच्या दिलेल्या शिकवणुकीचा विचार हवा. कोणीही येऊन प्रथा, परंपरा मोडित काढणे हे अयोग्य आहे. 1991 मध्ये प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या शनिदेवाची भजने व गुलशन कुमार निर्मित सुर्यपूत्र शनिदेव या चित्रपटाने या भूमीत शनिभक्तांनी गर्दी पहावयास मिळत असल्याचे सांगितले.
यावेळी कोल्हापूरचे नगरसेवक विनायक फाळके, प्रवीण पवार, सचिन आतार, छत्रपती देवस्थानचे व्यवस्थापक धनाजी खोत, छत्रपती घराण्याचे राजपुरोहीत अमर जुगर, नगरचे दशरथ गव्हाणे, यशवंत तोडमल, राजेंद्र खोजे आदी उपस्थित होते. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील विकास कामे पाहून संयोगिता भोसले यांनी समाधान व्यक्त केले.