संतलुकमधील कोव्हिड उपचार केंद्र सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न

कोटी रुपये थकल्याने सुविधा देणे अशक्य
File Photo
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

संतलुक हॉस्पिटलमधील करोना उपचार केंद्रास शासनाकडून आतापर्यंत एक रुपयाही मिळाला नाही.

त्यामुळे पैशाअभावी आता येथे रुग्णांना सुविधा देणे अशक्य झाले असून संतलुक हॉस्पिटलच्या चालकांनी प्रशासनाला तातडीने पैसे न दिल्यास नाईलाजास्तव हे उपचार केंद्र बंद करावे लागेल, असे लेखी कळविलेले आहे.

परंतु आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी सर्वप्रकारची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. हे केंंद्र सुरू राहण्यासाठी तहसीलदारांचेही प्रयत्न सुरू आहेत.

करोना रुग्णांवर श्रीरामपुरात उपचार व्हावेत म्हणून प्रशासनाच्यावतीने जूनपासून संतलुक हॉस्पिटल येथे करोना उपचार केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. आतापर्यंत या उपचार केंद्रातून सहाशेहून अधिकजण बरे होऊन घरी गेलेले आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या रुग्णांवर जे उपचार सुरू आहेत.

त्यात ऑक्सिजन, रोजचे डिझेल, रुग्णांना जेवण या खर्चासह नर्स, परिचारिका, सिक्युरिटी गार्ड या सर्वांचा पगार संतलुक हॉस्पिटलने आतापर्यंत केला. मात्र करोना रुग्णांशिवाय येथे दुसर्‍या कोणत्याही रुग्णांवर उपचार सुरु नसल्याने या ठिकाणी संतलुकला दुसरा कोणताच उत्पन्नाचा स्त्रोत नाही.

त्यामुळे करोना रुग्णांसाठीचे उपचार केंद्र व सेवा सुरु ठेवायची असेल तर आता त्यांना तातडीने सरकारकडून पैसे मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी संतलुक रुग्णालयाकडून नुकतेच श्रीरामपूरच्या तहसीलदारांना लेखी पत्र देण्यात आले. त्या पत्रात आतापर्यंतच्या कालावधीतील खर्च झालेली रक्कम तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सदर रक्कम न मिळाल्यास संतलुक हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांवर उपचार करणे अशक्य होणार आहे नव्हे तर नाईलाजास्तव करोना उपचार केंद्र बंद करावे लागेल, असे म्हटले आहे.

या पत्रानंतर काल प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, संतलुक करोना उपचार केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. वसंत जमधडे यांची बैठक झाली. यावेळी संतलुक हॉस्पिटलने दिलेल्या पत्रावर चर्चा झाली.

याबाबत डॉ. वसंत जमधडे यांच्याशी संपर्क साधला असता रुग्णांची प्रकृती बिघडू नये यासाठी आपण काम करत आहोत. नगरहून येणारे हॅण्डग्लोज, पीपीई कीट हे आपण रुग्णालयाला पुरवतो. आपण आपल्याला दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असून बिलाबाबत आपणास माहिती नसून त्याबाबत प्रशासन अधिक सांगू शकते, असे ते म्हणाले.

पगार कोठून करणार? खर्च कसा भागवणार?

याबाबत संतलुक हॉस्पिटलशी संपर्क साधला असता अशा प्रकारचे पत्र आम्ही प्रशासनाला दिले आहे. आम्ही सेवा द्यायला तयार आहोत, परंतु हॉस्पिटलमध्ये करोना सोडून इतर कोणत्याही रुग्णावर उपचार होत नसल्याने दुसरा कोणताही इन्कम सोर्स नाही. त्यामुळे हॉस्पिटलमधील स्टाफचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न आहे. गेल्या तीन महिन्यापासून आम्ही ऑक्सिजन, डिझेल, जेवण याचा खर्च केला. शिवाय करोना रुग्णांच्या सेवेसाठी असणारा स्टाफ, सिक्युरिटी गार्ड यांचाही पगार करावा लागतो. आता पैसेच शिल्लक नसल्याने रोजचा खर्च कसा भागवायचा ? हा प्रश्न आहे. त्यामुळे तातडीने आम्ही खर्च केलेले पैसे शासनाकडून मिळाले तरच आम्हाला या ठिकाणी कोव्हीड उपचार केंद्र सुरु ठेवणे शक्य होणार आहे. अन्यथा नाईलाजास्तव आज-उद्या बैठकीत आम्हाला हे उपचार केंद्र बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे संतलुक हॉस्पिटलच्या डॉक्टर रजनी यांनी सांगितले.

शासन स्तरावर प्रयत्न सुरु - तहसिलदार

याबाबत तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संतलुकचे आम्हाला पत्र मिळाले आहे. साधारणपणे 1 कोटी 3 लाखाच्या खर्चाची त्यांनी मागणी केली आहे. याबाबत शासनाकडून त्यांना पैसे उपलब्ध व्हावेत म्हणून वरिष्ठ पातळीवर नियमाप्रमाणे कार्यवाही केलेली आहे, परंतु ज्या रुग्णांवर येथे उपचार होतो त्यांचे रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर बरे झाल्यावर या रुग्णांनी या ठिकाणी पुन्हा येवून एक्स-रे काढण्यासह आवश्यक असणारी प्रोसिजर पूणर्र् करणे गरजेचे असते. त्याशिवाय महात्मा फुले जीवनदायी योजनेत सरकारकडून मिळणारे पैसे उपलब्ध होत नाही. बरे झाल्यावर रुग्ण मात्र पुन्हा हॉस्पिटलला येत नाही. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पेमेंट द्यायला उशीर झाला आहे. संतलुकला लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी शासन स्तरावर आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र अशा प्रकारे अचानकपणे प्रशासनाने अधिग्रहण केलेले हे संतलुकमधील कोव्हीड उपचार केंद्र घाईघाई बंद करता येणार नाही, असे आम्ही संतलुकला कळविले आहे, अशी माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली.

..तर दुसरे हॉस्पिटल घ्या

शासनाकडून पैसे न आल्याने पैशाअभावी जर आज उद्या संतलुक रुग्णालयातील करोनावरील उपचार केंद्र बंद झाल्यास करोना रुग्णांचे हाल होणार आहेत. श्रीरामपुरात संतलुकमध्ये उपचार केंद्र सुरू असताना वाढत्या रुग्णांमुळे जागा मिळत नाही. आता जर हे केंद्र बंद झाले तर रुग्णांवर उपचार होणार कोठे ? गोरगरिबांनी जायचे कुठे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे एकतर हे हॉस्पिटल चालू राहिले पाहिजे नाही तर तातडीने शहरात दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली पाहिजे, अशी मागणी शहरवासियांकडून करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com