
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एकाला अटक केली आहे. ज्ञानेश्वर राजू चव्हाण (वय 35 रा. विनायकनगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचे नागेबाबा सोसायटीमधील चार कर्जखात्यांमध्ये बनावट सोने आढळून आले आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी सांगितले.
शहर सहकारी बँक व संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीमधील बनावट सोनेतारण प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीमध्ये आठ हजार 564 ग्रॅम म्हणजे सुमारे साडे आठ किलो बनावट दानिगे आढळून आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 63 आरोपींविरूध्द एक हजार 450 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या बनावट सोनेतारणमध्ये ज्ञानेश्वर राजू चव्हाण याला अटक केली आहे. त्याचे चार कर्ज खात्यांमध्ये बनावट सोनेतारण आढळून आले आहे. एका खात्यात 117.30 ग्रॅम, दुसर्या खात्यात 44.690 ग्रॅम, तिसर्या खात्यात 60. 890 ग्रॅम तर चौथ्या खात्यात 49 ग्रॅम बनावट सोने आढळून आले आहे.
यावर त्याला एकुण आठ लाख 22 हजार रूपयांचे कर्ज दिले गेले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ज्ञानेश्वर चव्हाणला गुन्ह्यात अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे उपअधीक्षक जाधव यांनी सांगितले.