नेवासा येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी दिंडीचे प्रस्थान

पाचशे वारकर्‍यांचा सहभाग; ठिकठिकाणी स्वागत
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी दिंडीचे प्रस्थान

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी तसेच ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी पायी वारी पालखी दिंडीचे शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा जयघोष करत शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दिंडीत पाचशे वारकर्‍यांचा समावेश आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस खांब मंदिराचे निर्माते वै. बन्सी महाराज तांबे यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या दिंडीचे हे 53 वे वर्ष आहे. दिंडी प्रस्थानापूर्वी माउलींच्या चांदीच्या पादुकांचे व पैस खांबाचे शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. डोक्यावर माउलींच्या पादुका घेऊन ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष व टाळ मृदुंगाचा गजर करत प्रदक्षिणा घालण्यात आली. मंदिर प्रांगणात पुष्पांनी सजविण्यात आलेल्या रथामध्ये माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वासराव गडाख, भिकाभाऊ जंगले, ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ जगताप, कैलास जाधव, कृष्णाभाऊ पिसोटे यांच्यासह रामभाऊ खंडाळे, नानासाहेब तुवर, बबनराव धस, लक्ष्मण खंडाळे, काका गायके, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, शंकरराव लोखंडे, नारायण लोखंडे, गोरख घुले, डॉ.संजय सुकाळकर, जालिंदर गवळी यांनी दिंडीस शुभेच्छा दिल्या.

सदर दिंडीत भगवान महाराज जंगले शास्त्री, नंदकिशोर महाराज खरात, कृष्णा महाराज हारदे, अंजाबापू कर्डीले, राम महाराज खरवंडीकर, भास्कर महाराज तारडे हे भजनी मंडळातील सेवेकरी सहभागी झाले होते.

अग्रभागी माऊलींचे अश्व, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत ‘विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा जयघोष करत चाललेले वारकरी, अभंग गाणारे भजनी मंडळी, मध्यभागी पुष्पांनी सजविलेला रथ, त्यामागे डोक्यावर तुळशी कळस व ज्ञानेश्वरी घेतलेल्या महिला असे या दिंडीचे स्वरूप होते.

नेवासा शहरात दिंडी आली असता सतीश गायके, कृष्णा डहाळे, निरंजन डहाळे, अजित नरुला, राजेंद्र परदेशी, राजेंद्र मापारी, कैलास कुंभकर्ण, काकासाहेब शिंदे, पत्रकार सुधीर चव्हाण, रावसाहेब माकोणे, दत्तात्रय कांगुणे, राजेंद्र काळे, महेश मापारी,नितीन ढवळे, अंबादास लष्करे, सुभाष कडू, सुभाष चव्हाण आदींनी दिंडीचे फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत केले.

दिंडीच्या पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी भागवतराव शिरसाठ व शिवाजी शिरसाठ यांच्यावतीने दिंडीस अल्पोपहार देण्यात आला.त्यानंतर विखोना परीवारासह नेवासा मार्केट कमिटी परिसर येथे दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत होऊन दिंडीचे पंढरीकडे प्रस्थान झाले. दिंडीमध्ये पाण्याचे तीन टॅकर, डॉ. करणसिंह घुले यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पण फाऊंडेशनच्या वतीने मोफत रुग्णवाहिका कार्यरत केली असून तीन ट्रकचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com