आ. जगताप यांच्या समोरच माजी नगरसेवक झिंजे यांना मारहाण

टिळक रोडवरील घटना, 10 जणांविरूध्द गुन्हा || दुसर्‍या गटाकडूनही पोलिसांत फिर्याद
आ. जगताप यांच्या समोरच माजी नगरसेवक झिंजे यांना मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील माजी नगरसेवक संजय रत्नाकर झिंजे (वय 61, रा. चितळे रोड, नेहरू मार्केट शेजारी, नगर) यांना 10 ते 11 जणांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी टिळक रोडवर घडली. या प्रकरणी झिंजे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांच्या समोरच ही घटना घडल्याचा दावा माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी केला आहे.

सुरज सुभाष जाधव, सुशांत सुभाष जाधव, अर्जुन जज्जर, ऋषीकेश ऊर्फ भय्या डहाळे, सोनू संतोष दगडे व इतर पाच ते सहा जणांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. झिंजे हे त्यांचे मित्र माजी नगरसेवक अंबादास पंधाडे यांच्या पुतण्याच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी नवीन टिळक रोडवरील माऊली मंगल कार्यालयात गेले होते. तेथे दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास सुरज सुभाष जाधव याने झिंजे यांनी त्याच्याविरूध्द जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जाचा राग मनात धरून झिंजे यांना मंगल कार्यालयाच्या बाहेर ओढत नेऊन त्याच्या साथीदारांसह मारहाण केली. पुन्हा तू आमच्या वाट्याला गेलास तर तुला कायमचा संपवून टाकीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, माजी नगरसेवक झिंजे यांनी सुरज जाधव व त्याच्या साथीदारांविरूध्द ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधिक्षकांकडे केली होती. त्यानंतर जाधव याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई झाली होती. याचा राग मनात धरून त्याने कार्यालयात स्टेजवरच धक्काबुक्की केली व त्यानंतर कार्यालयाबाहेर आल्यावर त्याच्या साथीदारांसह आ. जगताप यांच्या समोरच मारहाण केल्याचा दावा झिंजे यांनी केला आहे.

दरम्यान दुसर्‍या गटाकडूनही यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. सचिन संतोष दगडे (वय 22, रा. भराडगल्ली, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्राबरोबर दुचाकीवरून जात असताना जुन्या वादातून संजय झिंजे यांच्यासह सात ते आठ जणांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. आयुर्वेद कॉर्नर जवळ मंगळवारी दुपारी ही घटना घडली असल्याचे दगडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

दगडे हे त्यांचा मित्र यश पंधाडे याच्या साखरपुडा कार्यक्रमाला गेले होते. तेथून दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मित्र सुशांत जाधव याच्या समवेत दुचाकीवरून जात असताना आयुर्वेद कॉर्नर जवळ संजय झिंजे, अनिकेत झिंजे, ललित झिंजे (सर्व रा.चितळेरोड) यांच्यासह इतर पाच अनोळखी व्यक्तींनी दुचाकी अडवून आमच्या नादाला कशाला लागले, असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com