
राहाता |वार्ताहर| Rahata
शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता राहाता शहरासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्व शासकीय निधीतून 4 रोहित्र मंजूर करून शेतकरी बांधवांना मोठा आधार देण्याचे काम केले असल्याची भावना माजी उपनगराध्यक्ष संजय सदाफळ यांनी व्यक्त केली.
सदाफळ म्हणाले, राहाता तालुक्यातील शेतकरी बांधवांकरिता शासकीय निधीवर अवलंबून न राहता तालुक्यासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्व शासकीय निधीतून 2 कोटी खर्चाचे रोहित्र देण्याचे काम केले आहे. हे महाराष्ट्रात नव्हे तर देशातील एकमेव उदाहरण आहे.
राहाता तालुक्यात गेल्या तीन वर्षापासून पर्जन्यमान समाधानकारक होत असल्यामुळे विहीर व कुपनलिका यांना चांगल्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी बांधव आपल्या शेतात चांगले पिके घेण्याकरिता अहोरात्र कष्ट करून मोठी मेहनत करतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर बागायत क्षेत्राबरोबरच जिराईत भागातही शेतात विविध प्रकारची पिके घेण्याकरिता शेतकर्यांची लगबग सुरू असते. पेरणी झाल्यानंतर उगवलेल्या पिकांना जीवदान मिळावे याकरिता पाण्याची अत्यंत गरज असते.
शेतातील विहीर व कुपनलिका यांना पाणी असूनही ते देण्याकरिता शेतकरी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे रोहित्रावर क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात दाब येत असल्यामुळे ते सातत्याने बंद होते. परिणामी पाणी असूनही शेतकर्यांना पिकांना पाणी देता येत नाही. अनेकदा रोहित्र नादुरुस्त होतात. परिणामी अनेक महिने रोहित दुरुस्त होऊन येण्याची वाट शेतकरी बांधवांना बघावी लागते.
पिकांना पाणी वेळेवर न मिळाल्याने शेतातून मिळणार्या चांगल्या उत्पन्नाची घटक होते. शेतकर्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकरी बांधवांना येणार्या समस्या ओळखून आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी तालुक्यातील गावांना 2 कोटी किंमतीचे स्व शासकीय निधीतून रोहित्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने राहाता शहरात 4 रोहित्र मंजूर झाल्याने रोहित्रावर येणारा अतिरिक्त विजेचा दाब आता कमी होऊन कृषी पंपांना सुरळीत वीज पुरवठा मिळण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी बांधवांनी या उपक्रमाचे स्वागत करून विखे पाटील कुटुंबियांचे आभार मानले असल्याचे सदाफळ यांनी सांगितले.