श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शिर्डी फास्ट पॅसेंजरला एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यास साईभक्तांना मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्याचा फेरविचार करण्यात यावा,

अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य तथा हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

गाडी नंबर 51033/51034 साईनगर-दौंड-पुणे (शिर्डी पॅसेंजर) ही रेल्वे आठ डब्यांची आहे. त्याऐवजी ती स्वतंत्रपणे चालणारी 18 डब्यांची करावी. याकरिता प्रवासी संघटना व रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी गेल्या पाच वर्षांपासून लढा दिला. त्या प्रयत्नाला अखेर यश आले असून शिर्डी फास्ट पॅसेंजरला एक्स्प्रेस करण्याचा तसेच 19 डब्यांची स्वतंत्र धावणारी रेल्वे दौंड-पुणे बायपासमार्गे धावेल असा विचार रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.

साईभक्तांना आज 100 ते 125 रुपये दराने मुंबईला जाण्याची सोय आहे. मात्र, पॅसेंजरला एक्स्प्रेस केल्यास रेल्वेच्या तिकिट दरात मोठी वाढ होऊन ती प्रवाशांवर अन्यायकारक ठरणार आहे. रेल्वे प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव व रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच या रेल्वेची वेळ उशिरा करण्यात यावी व मुंबई येथे सकाळी सहा वाजता असावी याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. यासंदर्भात खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजित श्रीगोड यांच्याकडे निवेदनाच्या प्रती पाठवून लक्ष वेधले आहे.