‘हॅलो मी छोटा राजन बोलतोय’

डॉनचा आवाज ऐकून मित्राची धांदल; अकोले नाका परिसरातील घटना
‘हॅलो मी छोटा राजन बोलतोय’

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

फोन कोणाचा आला म्हणून मोबाईल उचलला आणि कानाला लावला. मोबाईलमधून आवाज आला.... ‘मी छोटा राजन बोलतोय!’

हे ऐकून थरथराट झालेल्या त्या युवकाची घबराट झाल्याने त्याने खरंच कोण आहे? म्हणून पुन्हा विचारले. आपण कोण बोलतायं...? अरे तुला समजत नाही का? मी छोटा राजन बोलतोय! मोबाईलमधून दर्डावलेला आवाज आल्याने मित्राची धांदल उडाली. नको झंझट म्हणून घामाघूम झालेल्या त्या युवकाने मोबाईल स्वीचअप केला आणि डॉनच्या भितीपोटी त्याने दोन दिवस घरच सोडले नाही. ही घटना शहरातील अकोले नाका परिसरात घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अकोले नाका परिसरातील एका युवकाने नवीन मोबाईल व सीमकार्ड घेतले. मोबाईलमध्ये नवीन सीमकार्ड घालून आपल्या जिवलग मित्राला उत्सुकता निर्माण करण्याच्या या हेतूने पहिला फोन केला. त्याने आपल्या मोबाईलमध्ये स्वत:चे नाव सेव करण्याऐवजी छोटा राजन असे नाव सेव केले.

या नंबरवरुन मित्राला फोन जाताच छोटा राजनचा फोन आल्याचे त्याला वाटले. त्याने विचारणा केली असता मी छोटा राजनच बोलतोय, असे या मित्राने सांगितले. एवढ्या मोठ्या अंडरवर्ल्ड डॉनचा फोन असल्याचे समजून हा मित्र गर्भगळीत झाला. दोन दिवस त्याने घर सोडलेच नाही. घरच्यांनीही चौकशी केल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गंमत करणारा मित्र त्याच्या घरी आला. तुला छोटा राजनचा फोन आला होता काय? असे विचारले. हो आला होता. आणि मी पोलीस ठाण्यात ही माहिती देणार आहे. यानंतर गडबडलेल्या या मित्राने छोटा राजनच्या नावाने फोन मीच केला होता. तुला फसविण्यासाठी मी मोबाईलमध्ये छोटा राजन नाव टाकले, असे सांगून त्याने आपला मोबाईल दाखविला. वस्तुस्थिती समोर आल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. शहरात हा चर्चेचा विषय बनला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com