मद्यपी महिलेचा संगमनेरात तब्बल दोन तास राडा

मद्यपी महिलेचा संगमनेरात तब्बल दोन तास राडा

शिवीगाळ करत दुकानांमधील सामानाची तोडफोड

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

मद्याच्या धुंदीत तर्रर्र झालेल्या एका महिलेने काल दुपारी शहरातील विविध ठिकाणी तब्बल दोन तास गोंधळ घातला. तिने अनेकांना दमदाटी व शिवीगाळ करत त्या ठिकाणच्या दुकानांमधील सामानाची तोडफोड केली. उपस्थित पोलिसांनाही न जुमानता तिचा सुरू असलेला ऱाडा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

शहरातील मेनरोड परिसरातील चावडी येथे असणार्‍या तलाठी कार्यालयासमोर काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास मद्याच्या नशेत असलेली तीस वर्षे वयाची महिला अचानक अवतरली. तिने जास्त मद्य सेवन केल्याने तिचा स्वतःवरील तोल सुटलेला होता. चावडी परिसरात तिने अनेकांना शिवीगाळ केली. तिने घातलेला गोंधळ समजल्याने पोलिसांचे वाहन घटनास्थळी आले. पोलिसांचे वाहन पाहताच तिने पोलिसांनाही शिवीगाळ सुरू केली.

माझ्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही अधिकार्‍याला बोलवा मी घाबरत नाही, असे म्हणत तिने पोलिसांचे वाहन अडविले. दम असेल तर माझ्यावर कारवाई करून दाखवा असे खुले आव्हान तिने उपस्थित पोलिसांना दिले. तिचा अवतार पाहून पोलीस निघून गेले. यानंतर सदर महिलेने अशोक चौकात येऊन धिंगाणा घातला. याठिकाणी असलेल्या विविध छोट्या दुकानात जाऊन तिने सामानाची नासधूस केली. काही दुकानांमधील हजारो रुपयांच्या कपबशा व इतर साहित्य तिने फोडून टाकले काही वृद्ध माणसांनाही यावेळी तिने मारहाण केली.

दुकानात होत असलेले नुकसान पाहून काही महिलांनी तिची यथेच्छ धुलाई केली. याबाबत काही नागरिकांनी शहर पोलिसांना कळविले मात्र पोलीस घटनास्थळी आले नाही.

सदर महिलेने एका दुकानातील लोखंडी वस्तू हातात घेऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी तिने दगडफेकही केली. यानंतर नगरपालिकेची रुग्णवाहिका, पोलिस वाहन आले. महिला पोलिस कर्मचार्‍यांनी तिला रुग्णवाहिकेत बसवले. नंतर तिची रवानगी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. सदर महिला कुठली? तिने मद्य प्राशन कुठे केले व नंतर पोलिसांनी तिच्यावर काय कारवाई केली, याची माहिती समजू शकली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com