संगमनेर तालुक्यात युरिया खताची टंचाई
सार्वमत

संगमनेर तालुक्यात युरिया खताची टंचाई

उपविभागीय कृषी अधिकार्‍यांना शेतकरी प्रतिनिधींचे निवेदन; चार दिवसांत प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा

Arvind Arkhade

संगमनेर |प्रतिनिधी|Sangmner

खरीप हंगाम सुरू झाला असतानाही युरिया खताची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यामुळे शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कृषी विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. येत्या चार दिवसांत युरिया खत उपलब्ध करून द्या अन्यथा शेतकरी कृषी कार्यालयात येऊन आंदोलन करतील, असा इशारा शेतकरी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने दिला आहे.

तालुक्यात युरिया खताची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. खरिपाच्या पेरणीस प्रारंभ झाला असतानाच युरिया खतामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. तालुक्यातील कोणत्याही कृषिसेवा केंद्रात युरिया खत उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. भास्करराव दिघे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संतोष रोहोम, आरपीआयचे सोमनाथ भालेराव, राजेश चौधरी, डॉ. अरुण इथापे, संतोष पठाडे, संजय नाकील आदी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोर्‍हाळे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

मागील 15 दिवसांपासून तालुक्यात युरिया खत उपलब्ध नाही. शेतकर्‍यांची मागणी असतानाही युरिया का मिळत नाही असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संतोष रोहोम यांनी उपस्थित केला. खत उपलब्ध करण्यात कृषी विभागाला अपयश आले आहे. मंत्र्यांचा तालुका असूनही शेतकर्‍यांचे खतांसाठी होत असलेले हाल हे दुर्दैवी असल्याचे रोहोम म्हणाले.

खतांसाठी कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळेच शेतकर्‍यांचा खोळंबा झाला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कोविड 19 संकटामुळे शेतकरी अधिच आर्थिक संकटात सापडला आहे. चालू खरीप हंगाम हा एवढाच आशेचा किरण शेतकर्‍यांच्या समोर आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणी अधिक वाढवू नका. मागणीप्रमाणे खताची उपलब्धता करुन द्या अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे यांनी केली.

खताची विक्री जादा दराने होत आहे. खताचे लिंकिंगही मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याची गांभीर्याने दखल घ्या अन्यथा कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकर्‍यांना घेऊन आम्ही कोणत्याही क्षणी आंदोलन करू असा इशारा जनसेवा मंडळाचे अ‍ॅड. भास्करराव दिघे यांनी अधिकार्‍यांना दिला. याच मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनाही देण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com