31 लाखांचे खाद्यतेल लंपास

संगमनेरच्या दोघांवर गुन्हा, रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
31 लाखांचे खाद्यतेल लंपास

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

गुजरात येथील व्यापार्‍याला तब्बल 31 लाख रुपयांना फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. गुजरात येथून आणलेला तेलाचा ट्रक पुण्याला पाठविण्याऐवजी या तेलाचा परस्पर अपहार केल्याचे स्पष्ट झाल्याने गुजरातच्या व्यापार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेरातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगात तपास सुरू केला असून या तपासातून पाम तेलाच्या चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गुजरात येथून एका ट्रक मध्ये तेलाचे डबे संगमनेर येथील दोघेजण घेऊन येत होते. ट्रक मधील तेलाचे डबे पुणे येथील एका व्यापार्‍याला पोहोच करावयाचे होते. हा माल पुणे येथे पोहोचविण्याऐवजी या दोघांनी परस्पर गायब केला. आपला माल पुणे येथे पोहोचला नसल्याचे समजल्याने गुजरात येथील व्यापार्‍याने त्याची चौकशी केली. चौकशीत मालाचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले. या ट्रकमध्ये 27 लाख 53 हजार 939 रुपये किमतीचे 1090 सोया ऑईल तेलाचे डबे, एका डब्यात 15 लिटर तेल, 2 लाख 52 हजार 632 रुपये किंमतीचे 200 डबे, प्रत्येक डब्यात 1 लिटर सोया ऑइल चे पाऊच असे एका डब्यात 10 पाऊच असा एकूण 30 लाख 6 हजार 571 रुपयांचा माल होता.

हा माल ठरल्याप्रमाणे बसंत ट्रेडिंग पुणे येथे पाठविणे गरजेचे असतानाही याठिकाणी माल पाठवण्यात आला नव्हता. आपल्या मालाचा अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापारी अशोक कुमार रामनिवास चौधरी (रा. सुरत, राज्य गुजरात) यांनी याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरुन संगमनेरच्या दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 295/2021 भारतीय दंड संहिता कलम 406 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे करत आहे. एम एच 17 ए जी 7789 या क्रमांकाच्या ट्रकमधून ते तेलाची वाहतूक केली जात होती. तेलाच्या ट्रकसह दोघे जण फरार आहेत.

दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनी या घटनेचा तपास वेगात सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक माळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले असून या पथकाने नगर जिल्ह्यातील जामखेड येथे गुरुवारी जाऊन चौकशी केली आहे. काल हे पथक पुणे जिल्ह्यातील खेड येथे तपासासाठी गेले होते. या चोरीचा मुख्य सूत्रधार वेगळाच असल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या चौकशीत मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता काही पोलिसांनी बोलून दाखवली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com