संगमनेरात पाच कत्तलखान्यांमधून होतेय दररोज तीनशे जनावरांची बेकायदेशीर कत्तल

तालुका पोलिसांचेही छुपे सहकार्य
संगमनेरात पाच कत्तलखान्यांमधून होतेय दररोज तीनशे जनावरांची बेकायदेशीर कत्तल

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

राज्यात गोहत्या बंदीचा कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात मात्र दररोज खुलेआमपणे गोवंश जनावरांची हत्या होत आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या पाच कत्तलखान्यांमधून दररोज तीनशे गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी, अधिकार्‍यांसोबतच आता संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचेही कत्तलखाना चालकांना छुपे सहकार्य मिळत असल्याचे चित्र आहे.

संगमनेर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कत्तलखाने खुलेआमपणे सुरू आहेत. या व्यवसायामध्ये मोठी टीम कार्यरत आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल असलेला हा व्यवसाय संगमनेर शहरात बिनदिक्कतपणे सुरू आहे. गोहत्या बंदीच्या कायद्याचे संगमनेरात पालन केले जात नाही. संगमनेर शहरातील गोमांसाला मुंबई, ठाणे व कर्नाटकात मोठी मागणी आहे. संगमनेर शहरांमधून दररोज हजारो किलो गोवंश जातीच्या जनावरांचे मांस निर्यात केले जात आहे.

अनेक व्यवसायात नावाजलेल्या संगमनेर शहराने आता गोमांस विक्रीतही नाव कमावले आहे. गोमांस विक्रीचे राज्यातील प्रमुख केंद्र अशी ओळख आता संगमनेर शहराची होऊ लागली आहे. पोलिसांनी शेकडो वेळा कारवाया करूनही शहरातील कत्तलखाने सुरूच असल्याने पोलिसांच्या कारवाईकडे आता संशयाने पाहिले जात आहे. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड, जमजम कॉलनी, जोर्वे रोड या त्रिकोणामध्ये खुलेआम बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असतात. या कत्तलखान्यातील घाणीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याबाबत संबंधित नागरिकांनी संगमनेर नगरपालिकेला वेळोवेळी कळवूनही नगरपालिकेने याची दखल घेतलेली नाही. शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्यात यावेत, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना व अनेक नागरिकांची आहे. मात्र पोलीस खात्याकडून याबाबत समाधानकारक कारवाई होताना दिसत नाही. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच संगमनेर शहरात एकही बेकायदेशीर कत्तलखाना चालू देणार नाही, असा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला होता. यानंतर काही दिवस शहरातील कत्तलखाने पूर्णपणे बंद करण्यात आलेही होते. मात्र त्यानंतर हे कत्तलखाने पूर्ववत सुरू झाले आहेत. पोलीस निरीक्षक देशमुख हे आपला शब्द विसरले आहेत, अशी टीका केली जात आहे.

बेकायदेशीर कत्तलखान्यांतून दररोज सुमारे तीनशे जनावरांची कत्तल होत आहे. पाच पैकी तीन कत्तलखान्यांतील मांस कर्नाटक येथे पाठवले जाते तर दोन कत्तलखान्यांतील मांस मुंबईला पाठविले जाते. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकाला मांस पाठवणारे आता मुंबईला मांस पाठवू लागले आहेत. तयार झालेले मांस वेगवेगळ्या बर्फाच्छादित वाहनांमध्ये भरून ते बाहेर गावी पाठवले जात आहे. रात्री दहा वाजेपर्यंत कत्तलखाने सुरू ठेवावेत अशी अलिखित परवानगी कत्तलखाना चालकांना पोलिसांनी दिली की काय? असा सवाल विचारला जात आहे. असे असतानाही कत्तलखाना चालक दिवस-रात्र जनावरांची कत्तल करत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कत्तलखान्यावर कारवाई करावी, असे आदेश संगमनेर येथील एका भेटीत दिले होते. मात्र संगमनेर पोलिसांकडून या आदेशाची पायमल्ली करण्यात येत आहे. कत्तलखाना चालकाशी असलेल्या संबंधातून पोलिसांचे या कत्तलखान्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. संगमनेरात तयार झालेले मांस वेगवेगळ्या मार्गाने बाहेरगावी पाठवण्यात येते. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या गावांमधून या मांसाची वाहतूक केली जात आहे. तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी मात्र या वाहतुकीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत.

वसुलीसाठी कर्मचार्‍याची नियुक्ती

संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांमधून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. कत्तलखाना चालक अतिशय खुबीने पोलिसांची मर्जी सांभाळत आहेत. कत्तलखान्यातील मांसाची वाहतूक तालुका हद्दीतून देखील होत आहे. यामुळे संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी वसुलीसाठी एका पोलिसाची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com