संगमनेरात कत्तलखान्यावर छापा

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर त्वरीत कारवाई
संगमनेरात कत्तलखान्यावर छापा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

जिल्हाधिकार्‍यांनी आदेश देताच शहरातील कत्तलखान्यावर तातडीने मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील जमजम कॉलनी येथे केलेल्या कारवाईत पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेल्या आठ वासरांची मुक्तता केली असून याप्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊन मध्येही संगमनेर शहरात कत्तलखाने खुलेआम सुरू असून या कत्तलखान्यातून जनावरांची कत्तल होत असल्याची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकार्‍यांकडे काही नागरिकांनी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्वरीत संगमनेर कत्तलखान्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ अधिकारी नगरला पोहोचताच संगमनेर शहर पोलिसांनी रात्री शहरातील जमजम नगर येथे जाऊन कत्तलखान्याची पाहणी केली. या परिसरात चाळीस हजार रुपयांची आठ वासरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्वरीत पंचनामा करून ही वासरे ताब्यात घेतली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अशोक बर्डे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी रियाज अहमद अब्दुल रहीम शेख (रा. निंबाळे, ता. संगमनेर याच्याविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 211/2021 भारतीय दंड संहिता कलम 269, 429 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5 (क), 9 (अ), प्राण्यांना निर्दयतेने वागणूक कलम 3, 11 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक लबडे करत आहेत.

राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात मात्र या कायद्याची कोणतीही भीती उरली नसल्याचे या कारवाईवरून दिसून आले आहे. शहरांमध्ये खुलेआम कत्तलखाने सुरू असून यातून तयार होणारे मांंस मुंबई व ठाण्याला पाठवले जात आहे. या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे.

मात्र शहर पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने कत्तलखाना चालकांचे चांगलेच फावले आहे. शहरांमध्ये कत्तलखाने चालू देणार नाही असा निश्चय पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी व्यक्त केला होता. संगमनेर शहरात बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याने पोलीस अधिकार्‍यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. शहरांमध्ये कत्तलखाने सुरू असल्याचे रात्रीच्या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com