संगमनेर : खांडगावमध्ये सरपंच व वाळूतस्करांत धुमश्चक्री

संगमनेर : खांडगावमध्ये सरपंच व वाळूतस्करांत धुमश्चक्री

संगमनेर |शहर प्रतिनिधी|Sangmner

बेकायदेशीर वाळू उपशावरुन सरपंच असणारा एक वाळूतस्कर व इतर वाळूतस्करांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाल्याची घटना

काल मध्यरात्री तालुक्यातील खांडगाव परिसरात घडली. याबाबत संबंधीत सरपंचाने पोलीस व महसूल अधिर्‍यांना कळवूनही या खात्याच्या अधिकार्‍यांनी संबंधितावर कोणतीही कारवाई केली नाही.

तालुक्यातील खांडगाव परिसरातील प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे. बेकायदेशीर वाळू उपसा झाल्यास संबंधीतांवर त्वरीत कारवाई करावी अशी सूचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेर येथील एका बैठकीमध्ये केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी सूचना देवूनही संगमनेर तालुक्यातील प्रवरा व मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर खुलेआम वाळू उपसा सुरुच आहे. यामुळे जिल्हाधिकार्‍यांचा आदेश संगमनेरात पाळला जात नसल्याचे दिसत आहे.

खांडगाव येथे अनेक वाळूतस्कर बेकायदेशीर वाळू उपसा करत आहे. लगतच्या एका गावातील सरपंचही वाळूतस्करीत सहभागी आहे. त्याने खांडगाव येथून वाळू उपशाचा प्रयत्न केला. मात्र बाहेरील कोणालाही वाळू उपसा करुन द्यायचा नाही असा ठराव ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आल्याने या सरपंचाला या गावामधून वाळू उपसा करता येत नव्हता.

यामुळे संतापलेल्या सरपंचाने काल रात्री खांडगाव येथे जावून काही वाळू ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला. यामुळे वाळूतस्कर व त्याच्यामध्ये धुमश्चक्री उडाली. सरपंचाने त्वरीत पोलिसांना फोन करुन ही माहिती दिली. मात्र एकही पोलीस तिकडे फिरकला नाही. तालुक्यातील वाळू उपसा कुणाच्या आशिर्वादाने सुरु आहे याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com