संगमनेर तालुक्यात रात्रंदिवस वाळू उपसा
सार्वमत

संगमनेर तालुक्यात रात्रंदिवस वाळू उपसा

महसूल अधिकार्‍यांचे दुर्लक्ष; पोेलीस मात्र ‘सतर्क’

Arvind Arkhade

संगमनेर (शहर प्रतिनिधी)- तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील वाळूचा कोणताही अधिकृत लिलाव नसताना या नदीपात्रातून रात्रंदिवस भरमसाठ वाळूचा उपसा होत असल्याचे देवगड गावातील अपघाताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वाळू उपशावर कारवाई करण्याचे अधिकार महसूल खात्याला असताना महसूल खात्याचे अधिकार व कर्मचार्‍यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. काही पोलीस मात्र सतर्क असल्याचे दिसत आहे. महसूल पेक्षा पोलिसांचेच जास्त ‘लक्ष’ असल्याचे बोलले जात आहे.

संगमनेर तालुक्यातील प्रवरा व मुळा नदीपात्रातील वाळू बेकायदेशीर रित्या उपसली जात आहे. दररोज अनेक ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना दिसत आहे. वाळू तस्कर रात्रंदिवस वाळूचा उपसा करत आहे. यामुळे दोन्ही नदीपात्रात मोठे खड्डे पडलेले आहे. पठार भागातील नदीपात्रातून तर आधुनिक यंत्राने वाळू उपसली जात आहे.

अनेक डंपर मधूनही वाळू बाहेरील तालुक्यात पाठवली जात आहे. रात्रभर वाळू उपसा केला जात असताना संबंधित गावातील तलाठी व मंडलधिकारी यांचे मात्र या वाळू उपशांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. देवगड जवळ झालेल्या अपघातातील गाडी (झेनोन) निंबाळे जवळून वाळू घेऊन जात होता. निंबाळेजवळील नदीपात्रातून खुलेआम वाळू उपसा केला जात आहे.

बेकायदेशीर वाळू वाहतुकीबाबत महसूल खात्याने कारवाई करणे अपेक्षित आहे. संगमनेरात मात्र पोलीस खातेच याबाबत सतर्क दिसत आहे. पोलीस अनेकदा वाळू वाहतूक करणार्‍या गाड्यांचा व ट्रॅक्टरचा पाठलाग करतात.

पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. महसूल अधिकार्‍यांपेक्षा पोलीस अधिकारी कारवाईमध्ये श्रेष्ठ ठरत आहे. अशी टीका तालुक्यात सुरू झाली आहे. पोलिसांचा कारवाई मागचा नेमका हेतू काय याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. तहसीलदारांनी वाळू उपशाबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

संगमनेर तालुक्यातील देवगड फाट्याजवळ शनिवारी मध्यरात्री वाळूची गाडी निळवंडे कालव्याच्या खड्ड्यात पडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. या प्रकरणी निळवंडे काव्याच्या अधिकार्‍यांना दोषी ठरवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाळूची गाडी खड्ड्यात नेमकी कशी पडली याबाबत मात्र संबंधितांनी तपास केल्याचे दिसत नाही. पाठलाग चुकविणार्‍याच्या नादात तर गाडी चालकाचा तोल गेला नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या गाडीचा पाठलाग नेमका कोण व कशासाठी करत होते, याचा तपास करण्याची गरज आहे. असा तपास झाल्यास खरे दोषी समोर येतील. त्यांच्याविरुद्ध कारवाई होण्याऐवजी भलत्यावरच कारवाई झाल्याने ‘चोर सोडून संन्यासाला फाशी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

संगमनेर तालुक्यात अनेक जण वाळूचा व्यवसाय करीत आहे. प्रचंड पैसा या व्यवसायात मिळत असल्याने वाळूतस्करांनी आपली स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. महसूल अधिकार्‍यांची बारीक माहितीही नियंत्रणात ठेवते. यासाठी काही वाळूतस्करांनी पगारी माणसांंची नियुक्ती केली आहे. अधिकार्‍यांवर पाळत ठेवून वाळू वाहतूक करणार्‍यांना सावध करण्याचे काम ही माणसे करतात. काही वाळू तस्कर तहसील कार्यालय, अधिकार्‍यांचे निवास, तलाठ्यांचे निवास या परिसरात घिरट्या घालताना आढळतात. ते या ठिकाणी नेमके काय करतात? याचा शोध वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेण्याची गरज आहे.

Deshdoot
www.deshdoot.com