संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

‘संगमनेरात पोकलेन व बोटीच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळू उपसा’ या मथळ्याखाली दै. सार्वमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महसूल विभाग खडबडून जाग झाला.

वृत्ताची दखल घेत तहसीलदार अमोल निकम यांनी अप्पर तहसीलदार व महसूल कर्मचार्यांना घटनास्थळी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले. या अधिकार्यांना एका नेत्याचा फोन आल्याने कुठलीही कारवाई न करता या अधिकार्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे महसूल अधिकार्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महसूलच्या अधिकार्यांची वाळूतस्करांविषयीची असलेली भूमिका लक्षात घेता कुंपनच शेत खातयं याची प्रचिती येत आहे.

कोल्हेवाडी वाकन शिवारात सुरू असलेल्या मातीमिश्रीत वाळू उपशाबाबत अनेक तक्रारी महसूलकडे गेल्या आहेत. दै. सार्वमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच तहसीलदारांनी संबंधित प्रकरणाची तपासणी करण्यास महसूल अधिकार्यांना सांगितले. वाळूउपसा करणार्यांना ही माहिती मिळताच त्यांनी आपली वाहने इतरत्र हलवली.

तर बोटी बाहेर काढून घेण्यात आल्या. अधिकारी येण्या अगोदरच निरोप मिळाल्याने काल वाळू उपसा बंद होता. अधिकार्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र कुणा एका नेत्याचा फोन आल्याने अधिकार्यांना कारवाई करण्याऐवजी तेथून काढता पाय घ्यावा लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सदर ठिकाणी सुमारे 30 मोठी वाहने वाळू वाहतूक करत असून गेल्या पाच दिवसांपासून हा वाळू उपसा सुरू आहे. या प्रकरणात महसूलच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून कारवाई होण्याची अपेक्षा पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होत आहे.