संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गांजाची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे दिसत आहे.

दररोज तब्बल 200 ते 250 किलो गांजाची विक्री होत असून हा गांजा तालुक्यातील पुर्वेकडील एका गावातून पुरवला जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर गांजाची विक्री होत असताना पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

संगमनेर शहरात पूर्वी स्थानिक दोनजण गांजा विक्रीचा व्यवसाय करत होते. यामध्ये एका महिला व एका पुरुष गांजा विक्रेत्याचा समावेश होता. यातील पुरुष गांजा विक्रेत्याचा मृत्यू झाल्याने केवळ एक महिलाच गांजाचा सर्व व्यवहार हाताळत होती. गेल्या काही दिवसांपासून तिनेही आपला व्यवसाय बंद केला आहे.

तिच्यानंतर शहरात पाचजण गांजा विक्री जोरात करत आहे. बाहेरील तालुक्यातील गांजा विक्रेते संगमनेरात येऊन मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री करत आहे. तालुक्यातील कोकणगावजळील एका गावात मोठ्या प्रमाणावर गांजाचा साठा एका व्यक्तीने केल्याची माहिती आहे. सदर गांजा विक्रेता हा या व्यवसायात नवीन असून तो शहरात येऊन गांजा विकण्याचा प्रयत्न करत आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांजा विक्री होत असताना स्थानिक पोलीस याबाबत कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. याचा गैरफायदा बाहेरील अधिकार्यांनी घेतला आहे. हे अधिकारी संगमनेरात येऊन आर्थिक तडजोड करत असल्याची चर्चा आहे. शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी या प्रकरणी एका अधिकार्याची चांगलीच कानउघाडणीही केली होती.

शहरात सुरू असलेल्या गांजा विक्री संदर्भात काही जागृत नागरिकांनी पोलीस मुख्यालयातील वरीष्ठ अधिकार्यांना भ्रमणध्वनीवरून कल्पना दिली. मात्र एकाही अधिकार्यांनी याबाबत दखल घेतल्याचे दिसत नाही.