संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

भाड्याने घेतलेल्या कार चालकास पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून व हात पाय बांधून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिले.

कार व मोबाईल घेवून पाच दरोडेखोर पसार झाले ही घटना 6 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील निळवंडे येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपासात तालुका पोलिसांनी 10 लाखांचा मुद्देमाल, दोन गावठी पिस्तुल व चाकूसह 5 दरोडेखोरांना जालन्यातून ताब्यात घेतले.

अतुल नाथा मिंढे (रा. शिंदे, ता. खेड, जि. पुणे) हे शिर्डी मार्गे निळवंडे शिवरातून मारुती सुझुकी इरटीगा कार क्रमांक एम. एच. 14 जे. एच. 8207 हिच्यामध्ये पाच लोकांना भाडेतत्वावर घेवून जात होता. त्यावेळी पाच लोकांनी फिर्यादी अतुल मिंढे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून व डोळ्यात मिरचीची पावडर टाकली.

हातपाय बांधून मिंढे यांना गाडीतून रस्त्याच्या कडेला टाकून देत इरटीगा चारचाकीसह दरोडेखोरांनी धुम ठोकली. याबाबत अतुल मिंढे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 114/2021 भारतीय दंड संहिता 395, आर्म अॅक्ट कलम 3/25 प्रमाणे दाखल केला.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक फौजदार खंडीझोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल औटी, पोलीस नाईक शिवाजी डमाळे, पोलीस नाईक राजेंद्र घोलप, पोलीस नाईक ओंकार शेंगाळ, पोलीस नाईक मनोज पाटील, महिला पोलीस नाईक ज्योती दहातोंडे यांनी जालना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहकार्याने केला.

या तपासास राजेंद्र बाबासाहेब राऊत ऊर्फ राजन बाबुराव मुजुमल (वय 26, रा. परतुर जि. जालना), पांडुरंग उर्फ ओम बबन वैद्य (वय 24, रा. जोगदंडमळा, जालना), मोहम्मद इरफान मलीक (वय 24, रा. पडेगाव, औरंगाबाद), विशाल संजय जोगदंड (वय 20, रा. जोगदंडमळा, जालना) यांना पोलिसांनी मारुती सुझुकी कंपनीची इरटीगा या कारसह दोन गावठी पिस्तुल, चाकु असा सुमारे 10 लाख 2 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.