संगमनेरात पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी नऊ जणांना अटक

संगमनेरात पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी नऊ जणांना अटक
Picasa

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

पोलिसांना धक्काबुक्की करत तीन पोलिसांना बेदम मारहाण करणार्‍या जमावातील आणखी नऊ जणांना पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संचार बंदीच्या काळात नियमाचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. शहरातील तीन बत्ती चौक व कमल पेट्रोल पंपाजवळ फिरणार्‍या काही नागरिकांना पोलिसांनी जाब विचारून लाठी प्रसाद दिला होता. पोलिसांनी या नागरिकांना मारहाण केल्याचे वृत्त पसरल्याने तीन बत्ती चौक परिसरात एका समाजाचा मोठा जमाव जमला. या संतप्त जमावाने पोलिसांचे वाहन अडवून या वाहनावर दगडफेक केली होती. काही युवकांनी पोलिसांना मारहाण केली होती. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येताच एका पोलिसाने जमावातून आपली सुटका करून घेतली होती. यामुळे पुढील अनर्थ टळला.

जमावातील काही युवकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. काही जणांनी पोलिसांचे बॅरिकेट्स व तंबूही तोडून टाकला. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी त्या दिवशी रात्री दगडफेक करणार्‍या चार जणांना अटक केली होती. पोलिसांनी शनिवारी रात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आश्वी, घारगाव, अकोले येथील पोलिस अधिकार्‍यांना बोलावून कोम्बिंग ऑपरेशन राबविले. आरोपींच्या घराची झडती घेतली. यामध्ये नऊ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

आरोपींना अटक करताच समाजाचे काही नेते पोलीस ठाण्यात पोहोचले. मध्यरात्री पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून रिजवान मोहम्मद खान चौधरी (वय 31 वर्षे रा. अपनानगर), इर्शाद अब्दुल जमीर (वय 37, रा. भारतनगर), सय्यद जोयेबअली शौकत सय्यद (वय 27 वर्षे रा. तिणबत्ती चौक), अर्षद जावेद कुरेशी (राहणार लखमी पुरा), मोहम्मद मुस्ताक फारुख कुरेशी (वय 35 वर्षे रा. मोगलपुरा), शफिक इजाज शेख (वय 35 वर्षे रा. लखमीपुरा), युनुस नूर मोहम्मद शेख (वय 31 वर्षे रा. सय्यद बाबा चौक), फारुख बुर्‍हाण शेख (वय 45 वर्षे रा. मोगलपुरा), अरबाज आजीम बेपारी (वय 20 वर्षे भारतनगर) त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध. गुन्हा रजिस्टर नंबर 236/21 भारतीय दंड संहिता 353, 332, 337 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दुपारी सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

पोलिसांनी नऊ जणांना अटक केल्याचे वृत्त समजताच या समाजातील आजी-मजी नगरसेवकांनी त्वरीत पोलिस ठाणे गाठले ते उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. मात्र डीवायएसपी मदने यांनी आक्रमक भूमिका स्वीकारून या पदाधिकार्‍यांना पोलीस ठाण्यातून हुसकावून लावले. यातील एका पदाधिकार्‍यांच्या मुलालाही पोलिसांनी अटक केली आहे. आपला मुलगा दगडफेकीच्या घटनेमध्ये नव्हताच असे सांगणार्‍यां या पदाधिकार्‍याला पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज दाखविले. यामुळे फोन करणार्‍या या नेत्याला पोलिस ठाण्यातून काढता पाय घ्यावा लागला. गेल्या अनेक वर्षानंतर पोलीस अधिकार्‍यांनी प्रथमच आक्रमक कारवाई केली. शहरातील दिल्ली नाका तीन बत्ती चौक, भारत नगर आधी परिसरात कारवाई करण्यास पोलीस कचरत होते मात्र डीवायएसपी मदने यांनी काल पोलिसांचा आक्रमकपणा दाखविला. या कारवाईमुळे त्यांचे शहरातून अभिनंदन केले जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com