file photo
file photo
सार्वमत

स्क्रॅप झालेल्या रिक्षांवर पोलिसांची मेहेरनजर

संगमनेरात कालबाह्य रिक्षांतून होतेय प्रवासी वाहतूक

Arvind Arkhade

संगमनेर |शहर प्रतिनिधी|Sangmner

संगमनेर शहर व परिसरात कालबाह्य झालेल्या शेकडो रिक्षांमधून खुलेआम प्रवासी वाहतूक होत आहे. रिक्षांवर खोटे नंबर टाकून अनेक रिक्षाचालक शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. अनेक रिक्षा स्क्रॅप असतानाही पोलीस या रिक्षांवर कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रवाशांसोबत हा जीवघेणा खेळ असून एखादी अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल सुज्ञ नागरिक करत आहेत.

संगमनेर शहर व परिसरात हजारो रिक्षा अस्तित्वात आहे. यातील मोजक्याच रिक्षा नियमात बसणार्‍या आहेत. शहरातील सर्व प्रमुख चौकांत बसस्थानक परिसर, नवीन नगर रोड आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर रिक्षा उभ्या असतात. लगतच्या गावात या रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होत असते. वाहतूक पोलिसांसमोर खुलेआम या रिक्षा धावत असतात अनेक रिक्षा बेकायदेशीर असल्याची माहिती असूनही हे पोलीस अशा रिक्षांवर कारवाई करताना दिसत नाहीत.

अनेक रिक्षांची मुदत संपलेली आहे. या रिक्षांच्या कागदपत्रांवर स्क्रॅप असा उल्लेख आढळतो. पोलिसांनी अशा रिक्षांवर कारवाई केली तरी त्यांना पुन्हा सोडून देण्यात येते. अनेक रिक्षाचालक नाशिकमध्ये अतिशय स्वस्तात रिक्षा खरेदी करतात बोगस नंबर टाकून त्या शहरातून फिरवल्या जातात.

या रिक्षांतून दररोज शेकडो प्रवाशांची वाहतूक होत असते. मोडकळीस आलेल्या या रिक्षा प्रवासी वाहतूक करण्यास धोकादायक असतानाही यातून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वाहतूक होत असते. रिक्षा संघटना व पोलिसांचेही अशा रिक्षा चालकांना छूपे समर्थन असल्याचे दिसत आहे.

वाळू वाहतुकीसाठी रिक्षांचा वापर

संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू वाहतूक केली जाते. अनेक रिक्षांमधूनही वाळू वाहतूक होते. महसूल अधिकारी अथवा पोलिसांनी अशा रिक्षा पकडल्यास रिक्षा चालक कारवाईच्या भीतीने रिक्षा सोडून पळून जातात. दंडाची रक्कम मोठी असल्याने अनेकजण पुन्हा रिक्षा पोलिसांच्या ताब्यातून घेतही नाहीत. नाशिकहून अतिशय स्वस्तात आणलेल्या या रिक्षा पोलिसांच्या ताब्यात आहेत. धूळखात पडलेल्या काही रिक्षा पोलिसांनी नष्टही केल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com