लाखभर संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी अवघे 50 पोलीस, गुन्हेगारांचे फावले

लाखभर संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी अवघे 50 पोलीस, गुन्हेगारांचे फावले

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर शहर व परिसरातील सुमारे लाखभर संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी अवघे 50 पोलीस कार्यरत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. पोलिसांच्या अपुर्‍या बळामुळे गुन्हेगारांचे मात्र चांगलेच फावले आहे. 50 पोलीस शहराची सुरक्षा नेमकी करतात कसे हा चर्चेचा विषय बनला आहे.

संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. या तालुक्यात संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव व आश्वी असे चार स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आहे. या चार पोलिस ठाण्यापैकी कामाचा भार संगमनेर शहर पोलिस ठाण्यावर सर्वाधिक असतो. संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांचे गुन्हेगारांवर नियंत्रण राहिले नसल्याने शहरातील गुन्हेगारी फोफावली आहे. मागील आठवड्यात एका जमावाने थेट पोलिसांवर हल्ला करून तिघा पोलिसांना मारहाण केली होती.

या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्याच्या कारभाराकडे नागरिकांचे लक्ष गेले आहे. अधिक माहिती घेतली असता संगमनेर शहर पोलिस ठाण्यात पोलिसांची संख्या अतिशय अपुरी असल्याचे निदर्शनास आले आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याला 120 पोलिस कर्मचार्‍यांची मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी केवळ 70 पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 70 पैकी 20 कर्मचारी सध्या वेगवेगळ्या कारणावरून रजेवर आहे. यामुळे उरलेल्या अवघ्या 50 कर्मचार्‍यांवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आहे.

संगमनेर शहराच्या लोकसंख्येने एक लाखाचा आकडा पार केलेला आहे. एक लाख संगमनेरकरच्या सुरक्षेसाठी अवघे 50 पोलीस कार्यरत आहे. या कर्मचार्‍यांवर कामाचा मोठा ताण असल्याने शहरातील नागरिकांची सुरक्षा ‘राम भरोसे’ झाली आहे. शहराचे पोलीस निरीक्षक गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. यामुळे संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांच्याकडे संगमनेर शहराचा ही कार्यभार सोपविण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील 70 पैकी तब्बल 20 पोलीस कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. हे कर्मचारी रजेवर जाण्याची कारणे चर्चेचा विषय बनली आहेत. अधिकारी रजेवर गेले की कर्मचारी हजर होतात हा विषय देखील चर्चेचा बनला आहे.

गैरहजर पोलीस कर्मचार्‍यांवर पोलीस अधिकारी काही कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पूर्वीचे पोलीस निरीक्षक आक्रमक पद्धतीने काम करत होते, यामुळे शहरात गुन्हेगारांवर वचक बसला होता. विद्यमान पोलिस अधिकार्‍यांनी शहरातील गुन्हेगारी कडे दुर्लक्ष केल्याने गुन्हेगारांनी याचा चांगलाच फायदा घेतला आहे. शहरातील कत्तलखाने खुलेआम सुरू असून याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आहे. शहर पोलीस ठाण्यात प्रामाणिक काम करणारे काही कर्मचारी आहेत जे काम करतात त्यांच्याकडूनच काम करून घेण्याची पद्धत शहर पोलिस ठाण्यात सुरू असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

यामुळे प्रामाणिक काम करणार्‍यावर कामाचा मोठा ताण येतो. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात लक्ष घालून येथील कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. पोलीस अधिकार्‍यांनी शहरातील गुन्हेगारीकडे दुर्लक्ष केले तर शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यास वेळ लागणार नाही अशी चर्चा होताना दिसत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com