संगमनेरातील जुना-नाशिक-पुणे महामार्ग होणार चौपदरीकरण

संगमनेरातील जुना-नाशिक-पुणे महामार्ग होणार  चौपदरीकरण
File Photo

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर शहरातून जाणारा जुना नाशिक- पुणे महामार्गावरील च्या संगमनेर खुर्द, बस स्थानक ते अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत 9 किलोमीटरच्या रस्त्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून 24 कोटी 56 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातून या रस्त्याचे चौपदरीकरण व सुशोभीकरण होणार असल्याने शहराचे वैभव आणखी वाढणार असल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देतांना दुर्गाताई तांबे यांनी सांगितले की, संगमनेर शहरातून जाणार्‍या जुना नाशिक- पुणे महामार्गावर संगमनेर खुर्द, बस स्थानक ते अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंतचा रस्त्यावर सातत्याने मोठी वाहतूक वर्दळ असते. शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करून सर्वप्रथम 9 किलोमीटरचा विना टोल बायपास मंजूर करून घेतला. यानंतर नाशिक ते पुणे रस्त्याचे चौपदरीकरणाचे कामही पूर्ण झाले.

बाहेरची वाहतुक जरी बायपास रस्त्यावरून जात असली तरी संगमनेर शहरातील वाहतूक, विविध महाविद्यालय आणि दळणवळण यासाठी हाच मुख्य रस्ता असल्याने या रोडवर सातत्याने वर्दळ होती. यामुळे या रस्त्याचे चौपदरीकरण व सुशोभिकरण व्हावे यासाठी ना. थोरात यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. या सततच्या पाठपुराव्यातून आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या चौपदरीकरण व सुशोभीकरण कामाला मंजुरी दिली असून त्यासाठी 24 कोटी 56 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

यामुळे संगमनेर खुर्द, दिल्ली नाका, बस स्थानक ते अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंतचा 9 किलोमीटरचा रस्ता चौपदरीकरण होणार असून विद्युत रोषणाई सह मध्यभागी दुभाजक टाकले जाणार आहेत. या महामार्गालगत असलेल्या महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने पायी चालणार्‍या विद्यार्थी व नागरिकांसाठी पूर्ण 9 किलोमीटर पादचारी मार्ग सुद्धा बनवण्यात येणार आहे. या पूर्ण रोड मुळे संगमनेर शहराचे वैभव वाढणार असून या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी नव्याने केलेले हायटेक बसस्थानक हे राज्यातील अद्यावत बस स्थानक ठरले आहे. त्याचबरोबर शहरातील वैभवशाली इमारती, नव्याने झालेली कोर्ट इमारत या रस्त्यालगत असलेली विविध महाविद्यालय हे शहराचे वैभव वाढवणारी आहे. नव्याने होणार्‍या या चौपदरी रस्त्यामुळे संगमनेर शहर अधिक सुंदर होणार असून हा निधी मंजूर झाल्याबद्दल नामदार बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आभारही व्यक्त केले आहे.

नामदार थोरात यांच्या पाठपुराव्यातून होणार्‍या संगमनेर मधील जुना नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरण व सुशोभीकरणामुळे संगमनेर शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वांनी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

कसा असेल नवीन रस्ता?

- 9 कि. मी. लांबीचा चौपदरी मार्ग

- 24.56 कोटी रुपये निधी मंजूर

- संपूर्ण 9 कि. मी. मार्गावर दुभाजक

- स्ट्रीटलाईटची सोय

- रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com