संगमनेर नगरपालिका स्वच्छ सर्व्हेक्षणात देशात पाचवी

संगमनेर नगरपालिका स्वच्छ सर्व्हेक्षणात देशात पाचवी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सेव्हन स्टार स्पर्धेत संगमनेर नगरपालिका सहभागी झाली होती. यात संगमनेर नगरपालिकेने स्वच्छतेसाठी ओला कचरा, सुका कचरा, घंटागाडी, खत निर्मिती, गार्डनची निर्मिती, शौचालये व एक रुपयात 1 लिटर स्वच्छ पाणी अशा विविध उपक्रमांची देशपातळीवर दखल घेतली असून स्वच्छ सर्व्हेक्षणात पश्चिम विभागातील 6 राज्यांमधून संगमनेर नगरपालिकेला 5 वा क्रमांक मिळाला आहे. यामुळे नगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या नगरपालिकेने सातत्याने लोकाभिमुख काम करून आपला राज्यात ठसा उमटविला आहे. नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी सतत नागरिक व महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करून स्वच्छ व हरित संगमनेर बनविण्यासाठी काम केले आहे.

शहरात वैभवशाली इमारतींसह 28 नव्या गार्डनची निर्मिती, संगमनेर बाह्यवळण रस्ता, प्रवरा नदीवर चार पूल, रस्ते, भूमिगत गटारी, मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण अशी विविध विकास कामे शहराचे वैभव ठरले आहे. या सर्व कामांची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी संगमनेर नगरपालिकेचा विविध पुरस्कारांनी गौरव केला आहे.

यामध्ये यापूर्वी संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान दरम्यान शासनाच्या वतीने संगमनेर नगरपरिषदेस दोन वेळेस पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच गतीमान प्रशासन म्हणूनही संगमनेर नगरपरिषदेस पुरस्कार मिळाला आहे तसेच नगरपालिकेला 1 स्टार मानांकन मिळाले असून ओडीएफचे प्लस प्लस सर्टीफिकेशन प्राप्त झाले आहे.

केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत या स्पर्धेत संगमनेर नगरपालिका सहभागी झाली होती. यावेळी महाराष्ट्रातून 323 नगरपालिकांनी सहभाग नोंदवला होता. संगमनेर नगरपालिकेने राबविलेले घनकचरा व्यवस्थापन शहरातील स्वच्छता, ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण, कंपोस्ट खतावरील प्रक्रिया, कचरा विल्हेवाटची सर्व प्रक्रिया शासन नियमाप्रमाणे केली जात आहे.

याचबरोबर नगरपालिकेचे कर्मचारी 24 तास स्वच्छतेसाठी काम करीत असून करोना काळातही सर्वांनी नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी अधिक काम केले आहे. या सर्व्हेक्षणात शहरातील 16 हजार नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. या सर्वांची दखल घेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा या राज्यांमधील सहभाग घेतलेल्या सर्व नगरपालिकांमधून संगमनेर नगरपालिकेला 5 वा क्रमांक मिळाला आहे.

संगमनेर नगरपालिकेला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष सौ. सुमित्राताई दिड्डी, आरोग्य सभापती नितीन अभंग,सभापती राजेंद्र वाकचौरे, किशोर टोकसे, शमा शेख, श्रीमती सुहासिनी गुंजाळ, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com