संगमनेरात भावानेच केला भावाचा खून
सार्वमत

संगमनेरात भावानेच केला भावाचा खून

Arvind Arkhade

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

भावाने केलेल्या शिवीगाळीमुळे पत्नी घर सोडून माहेरी गेल्याचा राग मनात धरून अंध असलेल्या छोट्या भावाने आपल्या सख्ख्या मोठ्या भावाचा सुरीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शहरातील माताडे मळा परिसरात घडली. किशोर मनोहर अभंग (वय 32, रा. माताडे मळा, सुकेवाडी रोड, संगमनेर) असे मयताचे नाव आहे.

मनोहर काशिनाथ अभंग (वय 68) हे सेंट्रींग काम करून उदरनिर्वाह करत होते. ते आपल्या तीन मुलांसह सुकेवाडी रस्त्यावरील माताडे मळा येथे राहतात. त्यांचा मोठा मुलगा किशोर अभंग (वय 32) रंगकाम करतो, दुसरा मुलगा साहेबराव अभंग हा सेंट्रींग काम करत होता. हे काम करत असताना आठ वर्षांपूर्वी त्याच्या डोळ्यात लोखंडी खिळे गेल्याने तो दोन्ही डोळ्यांनी अंध झाला आहे. त्याची पत्नी दोन मुलांसह माहेरी बाभळेश्वर येथे राहते.

दरम्यान बुधवारी सायंकाळी साहेबराव अभंग आणि किशोर अभंग या दोन भावांमध्ये भांडण झाले. ‘तू शिवीगाळ केल्यामुळे माझी पत्नी मला सोडून गेली’ असे सांगत साहेबराव याने किशोरला शिवीगाळ केली. रात्री 10 वाजेच्या सुमारास साहेबराव याने किशोरच्या पोटावर सुरीने वार केले. 10.30 वाजेच्या सुमारास साहेबराव हा वडील झोपलेल्या रुमच्या दरवाजासमोर येऊन दरवाजा वाजू लागला आणि ‘एकाला संपविले आता तुमचा नंबर’ असे म्हणत आरडाओरड करू लागला. त्यामुळे वडील घाबरले.

त्यांनी दरवाजा उघडला नाही. मात्र शेजारी राहणार्‍यांनी त्यांच्या गच्चीवरून ओरडत मनोहर अभंग यांना सांगितले की, तुमचा किशोर जखमी अवस्थेत अंगणात पडलेला आहे. हे ऐकताच मनोहर अभंग यांनी दरवाजा उघडला. अंध मुलगा साहेबराव याच्या हातात सुरी दिसली तर जखमी किशोरच्या पोटातून रक्त निघत होते.

मनोहर अभंग यांच्या नातवाने त्याच्या मित्रांना बोलावून जखमी किशोर अभंग यास मोटारसायकलहून हॉस्पिटलमध्ये नेले. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी किशोर याची तपासणी केली असता तो मयत झाल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत मनोहर काशिनाथ अभंग यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी साहेबराव मनोेहर अभंग याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 1064/2020 भारतीय दंड संहिता 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित व शहर पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. ए. माळी करत आहेत.

पोलिसांनी साहेबराव अभंग यास अटक केली असून त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com