
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner
संगमनेर शहर व तालुक्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना प्रशासनाने सूचना देऊनही शहरातील व्यावसायिक या सूचनांचे पालन करत नसल्याने काल संगमनेर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. शहरातील एका मंगल कार्यालय सह सात दुकाने सील करण्यात आली आहेत. संगमनेर शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे.
कोविडच्या नियमांचे पालन न करणार्या दुकानांवर व मंगल कार्यालयावर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. शहरातील अनेक दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाही, याशिवाय मास्क न लावताच व्यवहार सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक मंगल कार्यालयांमध्ये लग्न व साखरपुड्याचे कार्यक्रम धूमधडाक्यात सुरू आहेत. मोठ्या गर्दीत हे कार्यक्रम सुरू असल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी संगमनेर नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी संयुक्त कारवाई केली. पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख हे स्वतः या कारवाईत सहभागी झाले होते. संगमनेर नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांनी काल सायंकाळी शहरात पाहणी केली असता अनेक दुकानात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे या दुकानांना सील लावण्यात आले आहे. शहरातील निमाई स्वीट, नाईस कलेक्शन, बी एम स्वीट्स, बेकरी, कॉलेज कॉर्नर जवळील हॉटेल व पार्लर या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.