
तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe
संगमनेर तालुक्यातील मालदाड येथून बॅगमधे ठेवलेले 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून लंपास केले होते.
याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करीत आरोपी रविकिरण सुखदेव मंडलिक (मूळ रा. समशेरपूर ता. अकोले) यास अटक करून 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. आश्चर्य म्हणजे आरोपीने चोरीचे दागिने एका नामांकित पतसंस्थेत गहाण ठेवून कर्ज काढलेही होते, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील दि. 17 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास भाऊपाटील देवराम नवले (वय 41 वर्षे) यांच्या घरासमोरून बॅगेतून 75 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, कानातील झुबे पान तसेच 1 लाख रुपये किंमतीचे प्रत्येकी 10 ग्रॅम वजनाचे 2 सोन्याचे कॉईन मिळून एकूण 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून लंपास करण्यात आले होते.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की, भाऊपाटील नवले यांनी मुंबई येथून भावाला व बहिणीला गावी मालदाड येथे आणण्यासाठी चारचाकी गाडी पाठविली होती. सदर गाडीवर चालक म्हणून रविकिरण सुखदेव मंडलिक हा पाठविला होता. दि. 17 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9 वाजता रविकिरण मंडलिक याने भाऊपाटील नवले यांच्या भावाला व बहिणीला मालदाड येथे घरी आणून सोडले.
यावेळी गाडीतील बॅगा रविकिरण मंडलिक याने घरासमोर आणून ठेवल्या होत्या. बहीण मानसी राहुल वाळूंज ही दि. 31 जानेवारी 2021 रोजी मुंबई येथे जाण्यासाठी निघाली असता बॅगमध्ये दागिने नव्हते. त्यामुळे गाडीचा चालक रविकिरण मंडलिक यानेच दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद भाऊपाटील देवराम नवले (रा. मालदाड रोड, संगमनेर) यांनी दिली होती. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी आरोपी रविकिरण सुखदेव मंडलिक (मूळ रा. समशेरपुर, हल्ली रा. संगमनेर) यास ताब्यात घेत पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात आरोपीने 10 ग्रॅम वजनाचे 2 सोन्याचे कॉईन राहाता येथील सोनारास विकले होते, तर संगमनेर येथील एका नामांकित पतसंस्थेत 3 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, कानातील झुबे पान कर्ज काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपीस न्यायालयाकडून पोलीस कस्टडी मिळवीत सदर चोरीच्या गुन्ह्याची कबुली घेतली. आरोपी रविकिरण मंडलिक याच्याकडून चोरून लंपास केलेले 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने कसून तपास करीत पोलिसांनी हस्तगत केले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षिका डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पो. नि. पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार इस्माईल शेख, हे. कॉ. विष्णू आहेर, पो. ना. आण्णासाहेब दातीर, पो. ना. शिवाजी डमाळे यांनी ही कामगिरी केली. पो. ना. आण्णाहेब दातीर हे दागिने चोरीच्या घटनेचा अधिक तपास करीत आहे.