करोना अपडेट
करोना अपडेट
सार्वमत

संगमनेर : करोना बाधितांचे द्विशतक; प्रशासनाचे दुर्लक्ष

संगमनेरात पुन्हा लॉकडाऊनची गरज

Arvind Arkhade

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

प्रारंभी शहरातील ठराविक भागात जाणवणारा करोना आता शहरातील सर्वच भागात व तालुक्यातील अनेक गावांमध्ये संक्रमित झाला आहे. शहरात करोनाचा प्रसार वेगाने होत असताना संगमनेर नगरपालिका प्रशासनाचे मात्र नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

शहरात कुठल्याही प्रकारची औषध फवारणी व आरोग्यासंदर्भात कोणतेही काम पालिकेकडून होताना दिसत नाही. तालुक्यात करोना बाधितांची संख्या 200 हून अधिक झाल्याने याला आळा घालण्यासाठी शहरात पुन्हा लॉकडाऊनची गरज असल्याचे दिसत आहे.

संगमनेर शहरात मार्च-एप्रिलमध्ये करोना बाधीत रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. या काळात शहरातील ठराविक भागातच असे रुग्ण आढळत होते. यामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले. रमजान ईदनंतर शहरातील लॉकडाऊन हटविण्यात आला. सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले. करोना संपल्यात जमा करून नागरिकांनी या आजाराकडे दुर्लक्ष केले.

अनेक नागरिकांनी बेफिकिरी दाखविल्याने व प्रशासनाने गांभीर्याने पाहणे सोडून दिल्याने शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दररोजच वेगवेगळ्या ठिकाणी करोनाबाधित नागरिक आढळत असून 200 पेक्षा अधिक नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत असताना संगमनेर नगरपालिका प्रशासन मात्र उपाययोजना करताना दिसत नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात औषधांची साधी फवारणीही करण्यात आली नाही. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कुठलीही उपाययोजना करतानाही पालिका प्रशासन दिसत नाही. संगमनेरातील नागरिक बेफिकिरीने वागताना दिसत आहेत. शहरातील मंगल कार्यालयात विवाह सोहळे थाटात पार पडत आहेत. लग्न सोहळ्यास मोजक्याच लोकांनी उपस्थित राहावे असे बंधन असतानाही विवाह सोहळ्यांंना गर्दी वाढत आहे.

अनेकजण सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. मास्क न लावताच अनेकजण फिरतानाही आढळत आहेत. शहरात करोनाचे संकट भयानक होत असतानाही नागरिकांना त्याची भीती वाटत नाही.

शहर व तालुक्यात करोनामुळे मृत्यू झालेल्यांचाही आकडा वाढत आहे. तालुक्यातील कुरण गावातील अवस्था अतिशय भयानक आहे. या गावात करोना बाधितांची संख्या वाढत असतानाही गावातील अनेकजण शहरात दररोज ये-जा करत आहे. प्रशासनाने वेळीच सतर्क होण्याची गरज आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी तालुक्यात पुन्हा प्रभावी लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचे अनेकांचे मत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com