संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

शहरातील प्रवरानदीकाठच्या पंपींगस्टेशन, साईनगर या परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक बिबट्या फिरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

या बिबट्याचा वनखात्याने त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

संगमनेर शहरात 15 वर्षांपूर्वी बिबट्याचे अचानक आगमन झाले होते. शहरातील इंदिरानगर परिसरात बिबट्या अचानक घुसल्याने मोठा गोंधळ उडाला होता. यानंतर प्रथमच शहराच्या परिसरात बिबट्या फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. शहरातील पंपींगस्टेशन व साईनगर या परिसरात सातत्याने हा बिबट्या आढळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. अन्नाच्या शोधात तो या परिसरात आश्रयाला आलेला आहे.

सोमवारी पहाटे एका महिलेच्या हा बिबट्या निदर्शनास आला. ती अंघोळीला पाणी तापवत असताना अचानक हा बिबट्या येथे आला. बिबट्याला पहाताच सदर महिला घरात पळाली. यामुळे ती बिबट्याच्या हल्ल्यातून ती वाचली. यानंतरही अनेक नागरिकांना या बिबट्याचे दर्शन झाले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी या भागात पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

बिबट्याच्या दहशतीमुळे मॉर्निंग वॉकसाठी फिरणारे नागरिकही भयभित झाले आहे. या रस्त्यावरून सकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र बिबट्याच्या चाहूलीमुळे अनेकजण मॉर्निंग वॉकसाठी येताना दिसत नाही. साईमंदिराच्या एका भिंतीवरून हा बिबट्या फिरत असतानाही अनेकांनी पाहिला आहे. या ठिकाणाहून तो मागील बाजूस असणार्या वसाहतीमध्ये घुसल्याचेही अनेकांच्या निदर्शनास आले आहे.