कासारा दुमालातील दारुच्या दुकानाकडे उत्पादन शुल्कचे दुर्लक्ष

कासारा दुमालातील दारुच्या दुकानाकडे उत्पादन शुल्कचे दुर्लक्ष
File Photo

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील कासारा दुमाला येथील बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या देशी दारूच्या दुकानाकडे ग्रामपंचायत प्रशासनासोबतच उत्पादन शुल्क च्या स्थानिक अधिकार्‍यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. आपल्या अगोदरच या देशी दारू दुकानाला परवानगी मिळाल्याचे स्थानिक अधिकार्‍यांनी सांगून हात झटकले आहे. या दुकानाबाबत या खात्याला पूर्ण कल्पना असूनही स्थानिक अधिकार्‍यांनी या दुकानाकडे दुर्लक्ष केल्याने उलट सुलट चर्चा सुरू आहे.

संगमनेर तालुक्यातील कासार दुमाला येथे गेल्या दोन वर्षांपासून हे देशी दारूचे दुकान सुरू आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या दुकानाची जागा बदलण्यात आली आहे. यासाठी चक्क भुमी अभिलेख खात्याचा खोटा दाखला बनवून त्याचा गैरवापर संबंधिताने केला आहे. ग्रामपंचायतीचाही कुठलाही दाखला नसताना हे देशी दारूचे दुकान खुलेआम सुरू आहे. हे देशी दारू दुकान बंद करण्यात यावे यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहे. संबंधित खात्यासह ग्रामपंचायतीकडे त्यांनी तक्रार केली होती. मात्र या दुकानावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. हे दुकान ग्रामपंचायत हद्दीत असतानाही सरपंच व ग्रामसेवक याबाबत बोलताना दिसत नाही.

गावात देशी दारूचे दुकान खुलेआम सुरू असताना ग्रामपंचायतीने या दुकानाला अद्याप एकही नोटीस बजावली नसल्याची माहिती समजली आहे. या दुकानामुळे गावातील वातावरण खराब होत आहे. शाळेतील मुले ही या दुकानातून दारू खरेदी करताना दिसतात. यामुळे पिढी बरबाद करण्याचे काम करणार्‍या या दुकानाचा परवाना त्वरीत रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

दरम्यान याबाबत स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता आपण पदभार घेण्यापूर्वीच या दुकानाला परवाना मिळालेला होता. या दुकानाबाबत आपल्याकडे तक्रारी आलेल्या नाहीत. तक्रारी आल्या तर दुकानाची निश्चितपणे चौकशी करू, असे त्यांनी सांगितले. या दुकानाच्या परिसरात असणारे मंदिर रजिस्टर केलेले नाही हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

चौकशी करुन कारवाई करु

राज्य उत्पादन शुल्क खात्याचे जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता या दुकाना बाबतचे वृत्त आपण वाचले आहे. या दुकानाची चौकशी करून निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यात बेकायदेशीररित्या काही दारूचे दुकाने सुरू आहेत. यामुळे परवानाधारक दुकानांचे मोठे नुकसान होत आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष शौकतभाई जहागीरदार यांनी दिली. अधिकार्‍यांसोबत आर्थिक तडजोड करून काही जण खोटे कागदपत्राच्या आधारे असे देशी दारू दुकान चालू करत आहेत. संबंधितांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी जहागीरदार यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com