मनसेचे नेते पानसेंनी घेतली इंदोरीकर महाराजांची भेट

पाठिशी उभे राहण्याची दिली ग्वाही
मनसेचे नेते पानसेंनी घेतली इंदोरीकर महाराजांची भेट

संगमनेर|प्रतिनिधी|Sangmner

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संगमनेरातील न्यायालयात फिर्याद दाखल झालेली असतानाच, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार नेते अभिजित पानसे यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतली. त्यांच्याशी सुमारे अर्धातास चर्चा केली.

अभिजीत पानसे यांनी काल शनिवारी दुपारी 1 वाजता इंदोरीकर महाराज यांची संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथील घरी भेट घेतली. या चर्चेत तुम्ही प्रबोधनचे उत्तम काम करत आहात. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा दिलासा त्यांनी महाराजांना दिला.

यावेळी महाराजांनी खंत बोलून दाखविली. आम्ही किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहोत. अशावेळी खच्चीकरण केले जात असेलतर कशासाठी समाजप्रबोधन करायचे? अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यावर इंदोरीकर महराजांच्या कीर्तनातून समाजप्रबोधनाचे चांगले कार्य घडत आहे.

त्यांनी स्वत:ची शाळा काढली आहे. त्यांचे हे मोठे कार्य आपण विसरणार आहोत का? असा सवालही पानसे यांनी यावेळी उपस्थित केला. एखाद्या छोट्या चुकीची दिलगिरी महाराजांनी व्यक्त केली आहे. एखाद्या वाक्याबद्दल टोकाची भूमिका घेणे चुकीचे आहे. ही फिर्याद मागे घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही पानसे यांनी स्पष्ट केले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वाहतूक नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत झोळेकर, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, तुषार बोंबले, श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष डॉ. संजय नवथर, विद्यार्थी सेनेचे विष्णू अमोलिक, शहर संघटक भारत शिंदे, शहर उपाध्यक्ष राजू शिंदे, संगमनेर तालुकाध्यक्ष संजय वाणी, शहरअध्यक्ष तुषार ठाकरे, अकोले तालुकाध्यक्ष दत्ता नवले आदी उपस्थित होते.

सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून राज्यभर गदारोळ उठला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

इंदोरीकर महाराजांनी याप्रकरणी खुलासाही केला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या मागणीवर पुरोगामी संघटना ठाम होत्या. अखेर त्यांच्यावर न्यायालयात फिर्याद दाखल कण्यात आली आहे.

यापूर्वीही माजी आमदार वैभव पिचड यांनी महाराजांना पाठिंबा दिला आहे. आता मनसेनेही पाठिशी उभे राहण्याची ग्वाही दिल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com