संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

करोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन अवाजवी गर्दी करणार्या संगमनेरातील तीन दुकानांवर स्थानिक प्रशासनाने कारवाई करत दुकाने सील केली.

प्रशासकीय पथकाने काल संगमनेरातील बहुतेक भागात अचानक छापे टाकून दुकानांची तपासणी केली. यात नवीन नगर रोडवरील प्रवरा मेडिकल, बसस्थानकावरील चंदुकाका सराफ सुवर्णपेढी आणि मालपाणी रस्त्यावरील राजबक्षी वडा सेंटर ही तीन दुकाने सील करण्यात आली आहेत. पुढील आदेश होईपर्यंत ही दुकाने सीलच राहणार आहेत. या कारवाईने संपूर्ण संगमनेरात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील वाढत्या करोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले संगमनेरात आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनासमवेत करोना परिस्थितीचा आढावा घेतला. दुकानांमध्ये अवाजवी गर्दी होते व दुकानदारासह ग्राहकही करोना नियमांकडे दुर्लक्ष करतात व विनामास्क वावरतात असा सूर या बैठकीतून समोर आला. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी पोलिसांना मास्कशिवाय फिरणार्यांवर सक्तिने कारवाईचे आदेश दिले.

त्यासोबतच ज्या दुकानांमध्ये सामाजिक अंतराकडे दुर्लक्ष करुन मास्क शिवाय दुकानदार अथवा ग्राहक आढळेल ते दुकान त्याच क्षणी महिनाभर सील करण्याचे आदेश दिले. सोबतच हा नियम तालुक्यातील मंगल कार्यालये, लॉन्स व अन्य आस्थापनांनाही लागू करावा व नियमांचे उल्लंघन झाल्यास धडक कारवाई करावी असे आदेशही स्थानिक प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, इंन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, सहाय्यक फौजदार रावसाहेब कदम आदींनी शहरातील विविध भागात फिरुन करोना नियमांचे उल्लंघन करणार्यांचा शोध सुरु केला.

मेनरोडवरील एका प्रसिद्ध कापड दुकानातही तपासणी करण्यात आली. मात्र सदर आस्थापनेकडून करोनाबाबत अतिशय कटाक्षाने नियमांचे पालन केले जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचवेळी नवीन नगर रस्त्याच्या वळणावरच असलेल्या प्रवरा मेडिकलसह श्री.ओंकारनाथ मालपाणी मार्गावरील राजबक्षी वडा सेंटर आणि बसस्थानकावरील चंदुकाका सराफ या ख्यातनाम सुवर्ण पेढीत करोना नियमांकडे दुर्लक्ष करुन दुकानातील कर्मचार्यांसह मोठ्या संख्येने असलेले ग्राहकही विनामास्क आणि सामाजिक अंतराशिवाय वावरतांना आढळून आल्याने पथकाने धडक कारवाई करीत वरील तिनही आस्थापने सील केली आहेत.