संगमनेर |शहर प्रतिनिधी|sangmner

राज्यात गुटखा विक्री व उत्पादन करण्यास प्रतिबंध असतांनाही संगमनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री होत आहे.

गुटखा विक्रेत्यांनी आता आपला तळ ग्रामीण भागात ठोकला आहे. तालुक्यातील उत्तरेतील एका मोठ्या गावामध्ये एका गुटखा व्यवसायीकाने मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा केल्याचे वृत्त असून तो या गावातून तालुक्यात सर्वत्र गुटखा पोहचविण्याचे काम करत आहे.

संगमनेर शहर व तालुका पोलिसांनी बेकायदेशीर गुटखा विक्रीविरुध्द मोहीम उघडली आहे. महिन्याभरात पोलिसांनी पाच ते सहा कारवाया केल्या आहे. या कारवाईत हजारो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

हा गुटखा नेमका येतो कुठून? या व्यवसायाचा मुख्य सूत्रधार नेमका कोण आहे. याबाबत पोलीस मात्र तपास लावू शकले नाही. समजलेल्या माहितीनुसार संगमनेर व राहाता तालुक्याच्या सिमारेषेवर असलेल्या एका मोठ्या गावामध्ये गुटख्याचा मोठा साठा असून या साठ्यातून तालुक्यात ठिकठिकाणी गुटखा विक्री केली जात आहे.

हा गुटखा व्यवसायीक गेल्या काही वर्षांपासून बेकायदेशीर गुटख्याचा व्यवसाय करत आहे. त्याने लाखो रुपयांचा गुटख्याचा साठा आपल्या गोदामात करुन ठेवल्याचे बोलले जात आहे. त्याने हा माल बाहेरील जिल्ह्यातून आणला असून चढ्या दराने तालुक्यात गुटखा विक्री होत आहे. पोलिसांनी छोटे मासे पकडले आता मोठा मासाही पकडावा अशी मागणी नागरीकांमधून केली जात आहे.