संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरातील नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावरील बोगद्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडण्यात शहर पोलिसांना यश आले.

ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. टोळीतील चारजण पकडण्यात आले असून एक चोरटा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त घालत होते. दरम्यान गुंजाळवाडी परिसरातील बोगद्याजवळ पाचजणांची टोळी अंधाराचा फायदा घेवून नागरीकांना लुटत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना गुप्त खबर्या मार्फत मिळाली. देशमुख यांनी याची कल्पना उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने यांना दिली.

मदने यांच्या सूचनेनुसार तातडीने पोलिसांचे पथक बोगद्याजवळ पाठविण्यात आले. पोलीस वाहन येत असल्याचे चोरट्यांनी पाहताच ते पळून जावू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता चौघांना जेरबंद केले. मात्र एकजण अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

जालिंदर मच्छिंद्र बर्डे (वय 30 रा. गुहा, ता. राहुरी), गणेश मच्छिंद्र गायकवाड (वय 23 रा. गुहा), लखन अर्जून पिंपळे (वय 30 रा. दोडरवीरनगर, ता. सिन्नर), सोमनाथ अर्जून पवार (रा. बाजारवाकडी ता. अ. नगर) या चौघांना पोलिसांनी अटक केली. पळून गेलेल्या चोरट्याचे नाव अशोक हरीभाऊ बनवटे (रा. श्रीरामपूर) असे असल्याचे चोरट्यांनी सांगितले.

पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांना उत्तरे देता आली नाही. त्यांच्याकडून दोन मोबाईल, लोखंडी वाकस, तीन फुट लांबीची लोखंडी कटवणी, करवत पान, दगड, मिरची पावडर, तीन मीटर दोरी, पिवळ्या रंगाची गलोर, मोटारसायकली जप्त केल्या. पोलिसांनी सर्व चोरट्यांना अटक केली आहे.

याबाबत पोलीस शिपाई ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी या चोरट्याविरुध्द गुन्हा रजिस्टर नंबर 86/2021 नुसार भारतीय दंड संहिता 399, 402 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक निकीता महाले करत आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख, हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, पोलीस नाईक विजय पवार, विजय खाडे, शिपाई अविनाश बर्डे, ज्ञानेश्वर सोनवणे, सचिन उगले, सुरेश मोरे यांनी सहभाग घेतला.