संगमनेरात आता होतेय गाढवांची चोरी

आंध्रप्रदेशमध्ये निर्यात, गाढव मालकांमधून संताप
संगमनेरात आता होतेय गाढवांची चोरी

संगमनेर | Sangmner

मोटारसायकल चोर्‍या, गंठण चोर्‍या, डाळिंब चोर्‍या, वाळू तस्करी अशा अनेक चोर्‍या होत असताना आता संगमनेरात गाढवांच्याही चोर्‍या होऊ लागल्या आहेत.

चोरलेली गाढवे थेट आंध्रप्रदेश राज्यात पाठविली जात आहेत. या गाढवांचा तेथे मांस म्हणून वापर केला जात असल्याने गाढवांची चोरी वाढली आहे. याशिवाय संगमनेरातील गाढवांना मागणी असल्याने त्यांची किंमतही दुपटीने वाढली आहे. गाढवांच्या सहाय्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणार्‍या नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

संगमनेर शहर व तालुक्यात गाढवाद्वारे मोलमजुरी करणार्‍या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. शहरातील काही समाजातील नागरिक गाढवांच्या सहाय्याने दिवसभर मोलमजुरी करतात. रात्रीच्या सुमारास ही गाढवे वस्तीवर बांधली जातात.

तर अनेक गाढवे शहरात मोकाट फिरत असतात. शहरात शेकडो गाढवे अस्तित्वात आहे. त्यांचा उपयोग मालवाहतुकीसाठी व इतर कामांसाठी केला जातो. यातून मिळणार्‍या उत्पन्नावर गाढवांचे मालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अनेक गाढवे मोकाट फिरत असतात. याचा गैरफायदा काहीजण घेत आहेत.

आंध्रप्रदेशमध्ये अनेकजण गाढवांच्या मांसाला पसंती देतात. त्यांची गरज ओळखून राज्याच्या विविध भागातून याठिकाणी गाढवे पाठविली जातात. या गाढवांना किंमतही चांगली मिळत असल्याने गाढवांची चोरी वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरातही अशाप्रकारे अनेक गाढवांची चोरी झाली असून या चोरट्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा,अशी मागणी गाढवांच्या मालकांकडून होत आहे.

श्रीगोंदा येथील एक दलाल संगमनेरात येऊन गाढवांची खरेदी करतो. इतर वेळेस पाच हजार रुपये किंमतीचे गाढव हा दलाल तब्बल 12 हजार रुपयांना विकत घेत आहे. खरेदी केलेले गाढव एका मोठ्या वाहनात भरून आंध्रप्रदेशात पाठवले जाते.

30 ते 35 गाढवे या वाहनात भरलेली असतात. या खरेदी-विक्रीच्या व्यवसाया व्यतिरीक्त काहीजण गाढवांची चोरीही करत आहेत. संगमनेरातील काही नागरिकांनी एका दलाला विरोधही केला होता. यासंदर्भात आपण पोलिसांकडे तक्रारही केल्याचे त्याने साांगितले.

गाढव चोरीचा तपास लागवा

संगमनेर शहरात अनेक गाढवे आहेत. रात्रीच्यावेळी या गाढवांची चोरी करून ते आंध्रप्रदेशमध्ये पाठविले जातात. यामुळे गाढव मालकांचे नुकसान होत असून या चोरीचा तपास लावा, अशी मागणी गाढवांची खरेदी -विक्री करणारा साहेबराव पवार याने केली. मी जेजुरीतून गाढव खरेदी करत असतो. संगमनेरातील गाढवांचा आंध्रप्रदेशमध्ये मांस म्हणून उपयोग केला जातो. पाच हजाराला खरेदी केलेले गाढव 12 हजाराला विक्री केले जाते. या धंद्यात जास्तीचा पैसा मिळत असल्याने गाढवांची चोरी होत असल्याचे पवार यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com