संगमनेर : बंधाऱ्यातील पाण्यात बुडून आजी व नातीचा दुर्दैवी मृत्यू

पंचक्रोशीत हळहळ
संगमनेर : बंधाऱ्यातील पाण्यात बुडून आजी व नातीचा दुर्दैवी मृत्यू

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव शिवारात बंधाऱ्याच्या डबक्यातील पाण्यात आजी व नातीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी ( दि. 30 एप्रिल ) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने चिंचोलीगुरव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

चिंचोलीगुरव येथील प्रमिला श्रीराम आभाळे ( वय ४७ वर्षे ) या नात भक्ती निलेश आभाळे (वय ७ वर्षे ) हिला सोबत घेऊन दुपारच्या सुमारास जाधव वस्ती परिसरात जनावरे चारण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान सदर परिसरात असलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यातील डबक्यात भक्ती आभाळे ही पडली असता आजी प्रमिला आभाळे या नातीस वाचवण्याचा प्रयत्न करताना पाण्यात बुडाल्या.

दोघींचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नजीकच्या शेतात सदर जनावरे गेली, मात्र जनावरांमागे कुणीच नसल्याने एका युवकाने बंधाऱ्याजवळ जावून पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला. या घटने प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. बंधाऱ्यातील पाण्यात बुडून आजी व नातीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने चिंचोलीगुरव गावावर शोककळा पसरली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com