संगमनेरात तलवारीचा धाक दाखवून सोन्याची चैन लुटली

4 जणांविरुद्ध गुन्हा
संगमनेरात तलवारीचा धाक दाखवून सोन्याची चैन लुटली

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याच्या कारणावरून एका जणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावल्याची घटना

काल बुधवारी दुपारी चार वाजता शहरातील चैतन्य नगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या गुन्ह्याबाबत संशय व्यक्त केला जात असून पोलिस अधिकार्‍यांच्या भूमिकेबाबत शहरात उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील प्रतिक शेटे याने धीरज पावडे, आकाश पावडे व निलेश काथे यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या कारणावरून निलेश काथे याने काल दुपारी 4 वाजेच्या सुमारास तलवार काढून वैष्णव राजकुमार मुर्तडक (वय 29, रा. चैतन्य नगर) याला दमबाजी केली.

याप्रसंगी तेथे उपस्थित असलेल्या प्रतिक शेटे यास इतर दोघांनी मारहाण केली. एकाने वैष्णव मुर्तडक यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून त्याला धमकी दिली. याबाबत मुर्तडक याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी धीरज पावडे (रा. रहाणे मळा, संगमनेर), निलेश काथे (रा. इंदिरानगर, संगमनरे), नागेश भांगरे (रा. अभंग मळा, संगमनेर), गोकुळ गडगे (रा. मालदाड रोड, संगमनेर) या चौघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 213/2021 भारतीय दंड संहिता 394 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल टोपले करत आहे.

पोलिस ठाण्यात हजर असलेल्या आरोपींनी चोरी केलीच कशी दरम्यान या गुन्ह्याबाबत पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी घटना घडली त्या दिवशी पोलीस ठाण्यात हजर होते. असे काही प्रत्यक्षदर्शींनीचे म्हणणे आहे. ते पोलिस ठाण्यात असताना त्यांनी सोन्याची चैन चोरीच कशी केली, असा सवाल या प्रकरणा संदर्भात दोन दिवसापूर्वी शहर पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकार्‍यांच्या दबावामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असल्याची जोरदार चर्चा आहे. घटना वेगळी असताना पोलिसांनी वेगळा गुन्हा दाखल का केला? अशीही चर्चा आहे. पोलिस अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप काही नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com