करोनाचे कारण; अनेकांची कामे अडकली
सार्वमत

करोनाचे कारण; अनेकांची कामे अडकली

वनखात्याच्या कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंदी

Arvind Arkhade

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

लॉकडाऊननंतर सर्व शासकीय कार्यालये खुले झाले असताना येथील वनखात्याच्या कार्यालयात मात्र अद्यापही लॉकडाऊन सुरूच आहे. या कार्यालयात विविध कामांसाठी येणार्‍या नागरिकांना प्रवेशद्वाराजवळ अडविण्यात येत असून करोनाचे नाव सांगून नागरिकांना आत येण्यास मज्जाव केला जात आहे. कार्यालयात प्रवेश मिळत नसल्याने नागरिकांची अनेक कामे अडली आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वच बंद करण्यात आले होते. शासकीय कार्यालयांनाही हा नियम लागू होता. नंतर हळूहळू कमी कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत ही कार्यालये सुरू करण्यात आली. आता जवळपास सर्वच शासकीय कार्यालये पूर्ववत सुरू झालेली आहे. संगमनेर खुर्द परिसरात असणार्‍या वनखात्याच्या कार्यालयात मात्र अद्यापही नागरिकांना प्रवेशबंदी आहे.

वनखात्याच्या कार्यालयाबाहेर असणार्‍या प्रवेशद्वाराजवळ एका शिपायाची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यालयात काम घेऊन येणार्‍या नागरिकांना या प्रवेशद्वाराजवळ अडविण्यात येते. वनखात्याच्या अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार आम्ही कुणालाही आत येऊ देत नसल्याचे शिपायाकडून सांगण्यात येते.

जंगलात फिरणारे अधिकारी करोनांमुळे नागरिकांनाही भेटण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसते. या कार्यालयात प्रवेशच मिळत नसल्याने नागरिकांची विविध प्रकारची कामे अडली आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्थानिक अधिकार्‍यांना सूचना देऊन या कार्यालयातील कामकाज पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांमधून केली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com