करोना बाधीत कैद्यांनी जेवण नाकारले
सार्वमत

करोना बाधीत कैद्यांनी जेवण नाकारले

संगमनेरात उपचारासाठी डॉक्टर फिरकेना; प्रशासनाचे दुर्लक्ष

Arvind Arkhade

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

करोनाची बाधा झालेल्या 22 कैद्यांकडे आरोग्य व महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही या कैद्यांवर कोणतेही उपचार केले जात नसल्याने संतप्त झालेल्या या कैद्यांनी जेवण नाकारले आहे.

संगमनेर कारागृहातील 22 कैदी करोना बाधीत असल्याचे चार दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेणे ऐवजी पुन्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. कैदी पळून जातील या भीतीमुळे त्यांना कारागृहात ठेवण्यात आले असले तरी आरोग्य खात्याने उपाययोजना करण्याची गरज होती मात्र चार दिवसात एकही डॉक्टर कारागृहाकडे फिरकला नाही.

उपचार मिळत नसल्याने संतप्त झालेल्या या कैद्यांनी जेवणासाठी आलेल्या डब्यांना हात न लावल्याने जेवणाचे डबे कारागृहाबाहेर तसेच पडून होते. महसुल व आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने कैद्यांनी दुपारचे जेवण नाकारुन एकप्रकारे निषेधच नोंदविला आहे.

दरम्यान याबाबत पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसून तुम्ही कारागृह अधिकार्‍यांशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले.

दरम्यान याबाबत तहसीलदार अमोल निकम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही कैद्यांची काळजी घेत असून लवकरच त्यांची रवानगी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कारागृह तथा कोव्हिड सेंटरमध्ये करणार असल्याचे सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com