करोना बाधीत कैदी अद्यापही संगमनेरच्या तुरुंगातच

करोना बाधीत कैदी अद्यापही संगमनेरच्या तुरुंगातच

महसूल, पोलीस खात्याची ढकलाढकली कैद्यांना मिळेना जागा

संगमनेर|शहर प्रतिनिधी|Sangmner

करोनाची बाधा झालेल्या व न्यायालयीन कोठडीची शिक्षा भोगत असलेल्या 22 कैद्यांना उपचारासाठी कुठे ठेवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या करोना बाधित कैद्यांना राहुरी कृषी विद्यापीठात हलवण्यात येईल असे सांगण्यात आले होते मात्र अद्यापही हे कैदी संगमनेरच्या तुरुंगातच खितपत पडले आहेत. महसूल व पोलीस खात्यातील अधिकारी जबाबदारीची ढकलाढकली करीत असल्याने कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संगमनेर तालुक्यात करोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. करोनाबाधितांचा आकडा एक हजाराच्या घरात पोहोचला आहे. संगमनेरच्या कारागृहातही करोनाची बाधा झाली आहे. या कैद्यांना योग्य उपचार मिळत नसल्याने याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. करोनाबाधित सर्व कैद्यांना राहुरीच्या कृषी विद्यापीठात तात्पुरत्या स्वरूपात बनविलेल्या कारागृह तथा कोव्हिड सेंटर मध्ये हलविण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले होते. मात्र या कैद्यांना अद्यापही राहुरी विद्यापीठात हलविण्यात आले नाही.

याबाबत अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता हे अधिकारी ढकला ढकल करत असल्याचे जाणवले. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्याशी संपर्क साधला असता कारागृहातील कैद्यांची जबाबदारी महसूल खात्याकडे आहे. यात पोलीस खाते काही करू शकत नाही, आम्ही महसूल अधिकार्‍यांना वारंवार सांगितले बॅडमिंटन हॉलमध्ये कैद्यांची व्यवस्था करण्याबाबत पत्रव्यवहार केला.

मात्र याबाबत पूर्तता करण्यात आली नाही. यामुळे कैद्यांना हलविता आले नसल्याचे पंडित यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अभय परमार यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली. जबाबदारी कारागृह प्रशासनाची असून पोलीस बंदोबस्ताचे काम करतात असे ते म्हणाले.

तहसीलदार अमोल निकम यांच्याशी संपर्क साधला असता या कैद्यांना राहुरी येथे पाठविण्यास कारागृह प्रशासनाने असमर्थता दाखवली यामुळे कैद्यांना राहुरी विद्यापीठात पाठविण्यास वेळ लागत असल्याचे निकम यांनी सांगितले. कैद्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत असून त्यांना आवश्यक औषधोपचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

संगमनेर नगरपालिकेच्या बॅडमिंटन हॉलमध्ये पोलिसांची सुरक्षा व्यवस्था पुरेशी नसल्याने याठिकाणी कैद्यांना ठेवणे अशक्य आहे. यावरून तुरुंगातील कैदी मात्र दोन्ही खात्यामुळे संगमनेरच्या तुरुंगात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Last updated

पोलिसांनी महसूल खात्याकडे कैद्यांबाबत पत्रव्यवहार केला. दोन पत्रे पाठविली. या पत्रातून 10 मागण्याही केल्या एकच जावक क्रमांक दोन्ही पत्रावर असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Last updated

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com