संगमनेरात करोनाबाधीत रुग्णांच्या अंत्यविधीचेही पॅकेज

रुग्णवाहिका चालक घेताहेत पाच हजार रुपये
संगमनेरात करोनाबाधीत रुग्णांच्या अंत्यविधीचेही पॅकेज

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

विवाह सोहळा, साखरपुडा, वाढदिवस या समारंभाचे पॅकेज घेणे ही नवीन बाब नाही. संगमनेरात आता मात्र करोना बाधित रुग्णाच्या अंत्यविधीचे हि पॅकेज घेण्यात येऊ लागले आहे. संबंधित डॉक्टर व रुग्णवाहिका चालक यांच्या संगनमतातून रुग्णाच्या अंत्यविधीचे पॅकेज घेऊन ‘मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा’ प्रकार घडत आहे. संगमनेर तालुक्यात करोनाने थैमान घातले आहे. शहरातील सर्वच उपचार केंद्र करोना बाधित रुग्णांनी हाऊसफुल झालेले आहेत.

संगमनेर तालुक्यातील रुग्णा बरोबरच बाहेरील तालुक्यातील व जिल्ह्यातीलही अनेक रुग्ण संगमनेरात उपचारासाठी येत आहेत. यामुळे नवीन रुग्णांना बेडही उपलब्ध होणे अवघड होत चालले आहे. संगमनेर तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असताना करोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही हळूहळू वाढत आहे. संगमनेर शहरातील अमरधाम मध्ये दररोज अंत्यविधी होताना दिसत आहे. करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित रुग्णालयातील कर्मचारी या रुग्णावर अंत्यसंस्कार करतात. रुग्णांच्या नातेवाईकांच्या ताब्यात रुग्णाचा मृतदेह दिला जात नाही.

नेमका याच संधीचा गैरफायदा संगमनेर शहरात घेतला जात आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह स्मशानभूमी पर्यंत पोहोचविला जातो. शहरातील अनेक रुग्णवाहिका चालकांनी व मालकांनी याचा गैरफायदा घेण्याचे काम सुरू केले आहे. संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांची संधान साधून हे रुग्णवाहिका मालक रुग्णांच्या नातेवाईकांना लुटत आहे. संगमनेर शहरात सध्या 20 रुग्णवाहिका कार्यरत आहे.

वेगवेगळ्या हॉस्पिटल समोर या रुग्णवाहिका उभ्या असलेल्या दिसतात. एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित डॉक्टर लगेच रुग्णवाहिकेला पाचारण करतात. रुग्णालयापासून स्मशानभूमी पर्यंत मृत व्यक्तीस घेऊन जाण्याचा दर पूर्वी किरकोळ स्वरूपात टाकला जायचा आता या दरांमध्ये बदल करण्यात आला आहे. अनेक रुग्णवाहिका चालक अंत्यविधीचा सर्व सोपस्कार स्वतः करत आहेत. यासाठी त्यांनी पॅकेज ठरवले आहे. एका मृत व्यक्ती मागे पाच ते सहा हजार रुपयांचे पॅकेज हे रुग्णवाहिका चालक घेताना दिसत आहे. यामध्ये अंत्यविधीसाठी लागणारे कापड आणल्यापासून इतर सर्व खर्च हे रुग्णवाहिका चालक करताना दिसत आहे.

हा धंदा आपल्यालाच मिळावा यासाठी काही रुग्णवाहिका चालकांनी डॉक्टरांशी संधान साधून आर्थिक कमाई सुरू केली आहे. शहरातील नवीन रुग्णवाहिका चालक अवघे एक हजार रुपये आकारत असताना जुने रुगणवाहिका चालक मात्र पाच ते सहा हजार रुपये घेताना दिसत आहेत. यातून काही ठिकाणी वादाचे प्रसंगही उद्भवले होते. करोना बाधित रुग्णांच्या अंत्यविधीच्या पॅकेज बरोबरच इतर बाबतीतही रुग्णवाहिका चालक बक्कळ पैसा कमवत आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना बर्‍याचदा सिटीस्कॅन साठी बाहेर पाठवावे लागते.

एका रूग्णालयातील दुसर्‍या रुग्णालयात या कामासाठी रुग्णवाहिका चालक त्यांना घेऊन जातात यासाठी शहरांमध्ये दिड हजार रुपये आकारले जातात घुलेवाडी येथील रुग्णाला संगमनेर येथे आणायचे असेल तर त्यासाठी दोन हजार रुपये आकारले जातात. या व्यवसायात मोठी आर्थिक कमी होत असल्याने अनेक जण या व्यवसायात उतरले आहेत. यांचा रुग्णवाहिकेशी कधी संबंध नव्हता अशा काही युवकांनी नवीन रुग्णवाहिका खरेदी केलेले आहेत. कमवलेल्या पैशातून काहींनी दोन दोन रुग्णवाहिका ही खरेदी केल्या आहेत.

संगमनेर शहरात वीस ते बावीस रुग्णवाहिका धावतात. मात्र आर.टी.ओ कडून या रुग्णवाहिकांची तपासणी होताना दिसत नाहीत. संबंधित खात्याने एकाही रुग्णवाहिकेचे कागदपत्र तपासल्याचे दिसत नाहीत. याचा गैरफायदा रुग्णवाहिका चालक घेत आहेत. चार दिवसापूर्वी दोघा युवकांनी रुग्णवाहिकेतून चक्क देशी दारूची वाहतूक केली होती, संबंधित प्रशासनाने याबाबत लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com