संगमनेरात करोनाच्या नावाखाली डॉक्टरांकडून मोठी आर्थिक लूट

संगमनेरात करोनाच्या नावाखाली डॉक्टरांकडून मोठी आर्थिक लूट

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

करोना रुग्णांची संख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढत असतांना शहरातील डॉक्टरांचे चांगलेच फावले आहे.

शहरातील अनेक डॉक्टरांनी रुग्णांची मोठी आर्थिक लुट चालविल्याने नातलग हतबल झाले आहे. करोना आजाराचाही कट प्रॅक्टीसचा शिरकाव झाला आहे. याचा फटका स्थानिक रुग्णांना बसत असल्याचे दिसत आहे. आर्थिक लोभापायी बाहेरच्या तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी प्राधान्य मिळत असून स्थानिक रुग्णांना बेड नसल्याचे कारण सांगून इतरत्र पाठविले जात आहे.

संगमनेर तालुक्यात मागील मार्च महिन्यात करोनाचा शिरकाव झाला. सहा महिन्यानंतर रुग्णांची संख्या घटल्याने प्रशासनाने सर्व व्यवहार पूर्ववत सुरु केले. शाळा, महाविद्यालये, बाजार, लग्न समारंभ सुरु झाल्याने मोठी गर्दी वाढू लागली.

यामुळे झपाट्याने करोनाचा पुन्हा उद्रेक झाला. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय रुग्णालयासोबतच शहरातील अनेक खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गर्दी वाढत आहे. नेमका याच संधीचा गैरफायदा शहरातील काही डॉक्टर घेतांना दिसत आहे.

शहरातील मोजक्याच दवाखान्यांमध्ये करोनाचा उपचार केला जातो. या दवाखान्यांमध्ये मागील 15 दिवसांपासून उपचारासाठी रुग्णांची गर्दी वाढली आहे. अनेक रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारण्यात आली आहे. दवाखान्यांमध्ये बेड रिक्त असतांनाही बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

जे डॉक्टर विविध रुग्णांचे स्पेशालिस्ट आहे. त्यांना करोनाचे रुग्ण घेण्याची परवानगी नसतांनाही ते करोनाचे रुग्ण घेवू लागले आहे. अशा डॉक्टरांनी करोनाचे रुग्ण घेतले तर त्यांना योग्य उपचार मिळतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. संगमनेरातील 28 रुग्णालयांमध्ये 879 बेडची सुविधा आहे. यामध्ये 138 ऑक्सीजन बेड, 38 व्हेंटीलेटर बेड उपलब्ध आहेत. सर्वाधिक बेड संजीवन हॉस्पिटलमध्ये आहेत असे असतानाही रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे.

अधिकार्‍यांच्या सूचनांकडेही दुर्लक्ष

दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकार्‍यांनी शहरातील डॉक्टरांची बैठक बोलावून त्यांना काही सूचना दिल्या. रुग्णालयामध्ये स्थानिक रुग्णांना प्राधान्य द्यावे. 80 टक्के स्थानिक रुग्ण व 20 टक्के बाहेरील तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी घेण्याचे त्यांनी सांगितले. मात्र या सूचनांचे पालन डॉक्टरांकडून होताना दिसत नाही. आर्थिक लोभापायी बाहेरील रुग्णांनाच प्राधान्य देण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. या बैठकीस डॉक्टरांना बोलविण्यात आले होते. मात्र अनेक डॉक्टरांनी बैठकीला स्वत: न जाता आपल्या कर्मचार्‍यांना पाठविले होते. काही औषध विक्रेतेही या बैठकीस उपस्थित होते. अधिकार्‍यांच्या ही बाब निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधितांना बैठकीतून हाकलून दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com